तू

This is the post excerpt.

तू अशीच रहा….
अवखळ वाऱ्यासारखी,
नुकत्याच उमललेल्या कळीसारखी,
दवबिंदूंनी भरलेल्या पानासारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला
भ्रमरांनी कितीही गुंजारव केला भोवती..

तू अशीच रहा..
सूर्याच्या तेजस्वी प्रकाशासारखी,
ताऱ्यांप्रमाणे शीतल लुकलुकणारी,
ज्योतीप्रमाणे तेवून दुसऱ्यांना प्रकाशणारी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
कितीही ग्रहणे आली तरी…

तू अशीच रहा…
निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी,
जीव अमर करणाऱ्या सुधेसारखी,
सागराला मिळण्याची ओढ असणाऱ्या नदीसारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
गडगडाटी पाऊसधारा कोसळल्या तरीही…

तू अशीच रहा…
निरभ्र आकाशासारखी,
ग्रह-चंद्र-सूर्य-ताऱ्यांच्या आकाशगंगेसारखी,
क्षितिजापल्याडच्या असिमीत अंबरासारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
काळ्या मेघांनी गर्दी केली तरीही…

तू अशीच रहा…
जशी आहे तशीच,
स्वतःच्या गुणदोषांसहीत,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
या अभिलाषी जगासाठी…।।
-निशिगंधा

रंगात काय आहे ?

” अगं बाई, तुझ्या चेहऱ्यावर तर सुरकुत्या यायला लागल्या. असं वय चेहऱ्यावर दिसणं चांगलं नाही.” डोळे फिरवत भिशीमंडळातली मैत्रीण म्हणाली. म्हणाली, कुचेष्टा केली की टोमणा मारला??? असो. वयोमानाच्याही खुणा दिसायला हव्यात. चिरतरूणपणाचं भाग्य आपल्याला थोडीच लाभणार.

“नाही गं, असं नाही..जरा धावपळ चालू आहे. त्यामुळे कदाचित…” विषय थांबवण्यासाठी माझी फेकाफेकीची उत्तरं तयार होती.

” डॉक्टरांना भेटून घे गं. थोडं आहे तोवरच उपचार करं..! ” तिचा सल्ला. वरून डॉक्टरांचं व्हिजीटिंग कार्ड फ्री!

मीटींग संपली. तिने डोक्यात विषयाचा भुंगा सोडून दिला. विचारांचा भुंगा सुसाट डोकं पोखरायला लागला. बहुतांश लोक असेच असतात. फक्त काड्या टाकून देतात. पेटलं तर पेटलं. बहुतांश वेळा ते पेटतचं.अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं. माफक शब्दांत क्रांती काय दंगली‌ घडवतात आयुष्यात.!

दोन चारदा मीही खरचं मोबाईल कॅमेऱ्यात चेहरा पाहिला. वयाचा आकडा मोठा घातकी. वाढत जातो. जबाबदारीच्या ओझ्यात लक्षात येत नाही, वाढत जातो. आणि अचानक आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यावर कळतं आपण खरंच वृद्धापकाळात प्रवेश ‌करतोय. हो ना करता करता मी डॉक्टरांना भेटायचं ठरवलं.

पाय ठेवता येणार नाही इतकी गर्दी. काहींना खरोखर त्वचेचे आजार होते, काहींना तरूण दिसावं हा आजार होता. जिकडे तिकडे फक्त गर्दी. अनोळखी. यांच्या नंतर आपला नंबर एवढीच ती ओळख.गर्दी.गर्दीत स्वतःच जग. स्वतःच्या जगात असंख्य विवंचना. विवंचनेत प्रत्येकजण गुरफटलेला. डोळ्यांत चलबिचल, मनावर जबाबदारीचं ओझं आणि गर्दीत भयाण एकटेपण.!

गर्दीतही चेहऱ्यांना ओळख नसावी आणि चेहऱ्यांतही आपण एकटे असावं, ही जाणीवच भयप्रद आहे. मी विचारांतून बाहेर आले. हॉस्पिटलमध्ये उपचाराआधी आणि उपचारानंतर असे बरेच पेशंटचे फोटो लावले होते. मी त्यांवर नजर टाकली.

कोडांवर उपचार, फोडांवर उपचार,डागांवर उपचार ! माणसांच्या मनावर उपचार हवेत,विभित्स नजरेवर उपचार हवेत. वासनेवर उपचार हवेत. मौनावर उपचार हवेत. अति बोलणाऱ्यांवर उपचार हवेत. माणसाच्या प्रत्येक व्यथेवर, कथेवर आणि भावनांवर उपचार हवेत.

हेच उपचार खूप आधी यायला हवे होते. शेजारच्या रमा मावशीचे भाजके डाग; त्यामुळे कायम पडद्यात राहणारी ती.खंडेरावाच्या चेहऱ्यावर ते विद्रुप देवीचे व्रण, रामभाऊचे कसल्याशा आजाराने सडलेले पाय आणि त्यातून कायम निघणारा पू आणि रेश्मा….! सगळ्यांची त्या त्या आजारातून मुक्ती झाली असती. इतकं दुःख कुणाच्याही वाट्याला यायला नको.

रेश्मा. रेश्मा पाच सहा वर्षांनी मोठी. दोन गल्ल्या सोडून राहणारी. मी, चुलत भाऊ दिन्या आणि रेश्माची फार मैत्री.रेश्माच्या आज्याला कोड होते. ते रेश्मात उतरले. अंगभर कोड. रेश्मा नाकी डोळी सुरेखच. तोंडभर, अंगभर सोलल्यासारखी पांढरट गुलाबी. मध्येच तपकिरी. निलगिरीच्या बुंध्यासारखी. मला ती कायम आकर्षित वाटायची‌. झेब्र्यासारखी कोरलेली. आखीव रेखीव. पण तिची व्यथाच वेगळी. पांढरट पायाची म्हणून हिणवलेली. चार चौघात मिरवायला कायमच लगाम.तिच्या आईला तिची प्रचंड चिंता वाटायची.

इतक्या लहान वयात लोकांच्या रोषाला सामोरे जाणं म्हणजे दिव्यच. ती निमूटपणे सगळं सहन करायची‌. चेहऱ्यावर उसनं हासू आणायची. तिच्यामुळे तिच्या भावांची लग्न रखडलेली.त्यांच्या रागालाही तिला सामोरे जावं लागायचं. दिन्याचा तिच्यावर विशेष जीव. तिला म्हणायचा, ” मी करतो तुझ्याशी लग्न.”

रेश्मा खळखळून हसायची. तिचे पांढरेशुभ्र दात चमकायचे.ती म्हणायची,” मी मोठी आहे दिनू. तू केवढासा आहेस.”दिनू म्हणायचा,” मीही होईन मोठा लवकर. मग आपण करू लग्न.” त्यानंतर पुढचे काही दिवस तो झाडावर लटक, दोरी उड्या मार असं काही करायचा. लवकर उंच झाला की लवकर लग्न, एवढी भाबडी समजूत होती त्याची.

मला रेश्मा चंद्रासारखी वाटायची.डाग असूनही सुंदर. मी स्वतःला आरशात पहायचे. मला माझ्यात वेगळेपण जाणवायचं नाही. एकही व्रण किंवा तीळ नसणारी तुकतुकीत त्वचा. पाटीसारखी कोरी करकरीत.मला रेश्माचा हेवा वाटायचा. एखाद्या चित्रकाराने रंगवावा, असा तिचा चेहरा. त्या कोडांत मी असंख्य आकार शोधायचे,ससा, हत्ती, ढग..!ती चालत बोलत चित्रकोडं वाटायची. चेहरा इतका बोलका कसा असू शकतो!

तीन चार वर्षांनी भर दुपारी गावात हाळी उठली. लोक भराभरा धावायला लागले. मी आणि दिन्या पण धावत गेलो.रेश्माच्या घरासमोर गर्दी आणि आरडाओरडा. गर्दीतून‌ आत गेलो. कुणीतरी चादरीत लपेटलं होत. ओळखू येऊ नये‌ इतका विद्रुप चेहरा. रेश्मा कुठेच दिसत नव्हती. मागून‌ कुजबूज ऐकू आली. रेश्मा ने जाळून घेतलं होतं. मी मटकन खाली बसले.रेश्माचे कोड आता कुणालाच दिसणार नव्हते. सगळं काही खाक झालं होतं. मी आणि दिन्या कितीतरी दिवस विमनस्क अवस्थेत होतो. दिन्याने नंतरही कोड असणाऱ्या मुलीशीच लग्न केले.

काळा दिसतो, सावळी आहे. रूपात कुरूप आहे. जाडी आहे. नाक बसक आहे, एक ना अनेक. अशा कितीतरी प्रमाणात आपण व्यक्ती मोजत राहतो.नकळत कितीतरी माणसं दुखावतो. या न्यूनगंडात असलेल्या माणसांना कधीच त्यातून बाहेर पडता येत नाही. बरीच जण हे जणू काही आपलं‌ प्राक्तन आहे आणि त्यात जगलच पाहिजे असं मानून आयुष्य रेटत राहतात. काही जण रेश्मा सारखी हळव्या मनाची सारं संपवून‌ टाकतात.

फोनच्या आवाजाने मी भानावर आले. माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते. फोन उचलला. तिकडून आवाज, “अहो, तुम्ही तुमच्या भाचीच्या स्थळासंदर्भात फोन‌ केला होता आमच्या मुलासाठी”

“हो,हो बोला ना. बायोडाटा वाचलात का?” मी सावरून बसले.

“हो, बायोडाटा उत्तम आहे हो. मुलगी चांगली उच्चशिक्षित आहे. पगार उत्तम आहे. पण…”

“पण काय… काही अडचण..?”

“म्हणजे अहो कसयं ना…”

“स्पष्ट सांगा असेल ते..”

“मुलगी जरा सावळी आहे हो, आमचा मुलगा गोरा आहे. जोडा शोभणार कसा…?”

मी फोन कट केला. मनात खोलवर वेदना झाली. आजही आपण रंगांना प्राधान्य देतो ही गोष्ट खटकली. वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने जेव्हा सावळ्या रंगापासून गोऱ्या रंगापर्यंतचा प्रवास अधोरेखित करून जाहिराती करतात तेव्हा खरंच सावळा वर्ण गुन्हा आहे का असं वाटायला लागतं. रंगांविरूद्ध लढे होतात, होत आहेत. नेल्सन मंडेला यांचा लढा प्रेरणा देतो. पण ही खोलवर रूजलेली मानसिकता तिचं काय? बिनचेहऱ्याच्या माणसांचे रंग आपण अनुभवतो. बिनरंगांचे चेहरे कधी अनुभवणार. हे सगळं कधीतरी बदलायला हवयं. विचार जाळता यायला हवेत त्याशिवाय काळ्या पांढऱ्या रंगाच्या राखेतून नव्या विचारांचा अंकुर फुटणार नाही.

सौंदर्य आपण फार तोकड्य पद्धतीने मोजतो असं वाटतं राहतं. सौंदर्यांची परिभाषा रंगरूपाच्या पलिकडे जायला हवी. माणसांच्या मनांचं सौंदर्य अधोरेखित व्हायला हवयं.नावात काय आहे तसंच रंगात काय आहे, हे ही तितक्याच सहजतेने स्वीकारायला हवयं.

समाप्त.

प्रभाती सूर नभी रंगती

” उद्या पहाटे पाच वाजता भेटूयात. अविस्मरणीय अनुभव येईल उद्या.” गाडीतून उतरत शहाजी सर स्मित हास्य करत म्हणाले. पूर्ण दिवस हनुमान पर्वत, लोटस महाल, तुंगभद्रा काठ फिरून पाय थकले होते. त्यात दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू करायचा होता. पुन्हा पहाटे उठायचं म्हणजे ?? माझी थोडी कुरकुर सुरू झाली.

“उद्या स्वर्गानुभव म्हणजे काय प्रचिती येईल.बघा विचार करा.” शहाजी सरांनी हसत निरोप दिला. गाडी वळाली तशी डोक्यात चक्र सुरू झालं. एखाद्या सर्वांगसुंदर अनुभवाला आपण मुकायच का? इथवर येऊनही महत्त्वाची गोष्ट न पाहता जायचं म्हणजे काय ?? विचारांचा गोंधळ सुरू झाला. मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आवरून बाल्कनीत चहा घेत बसले. दूरवर वीरूपाक्ष मंदिराच्या शिखरावरचा दिवा लुकलुकत होता. रात्रीच्या शांततेतलं हंपी नवीन भासत होतं. निश्चय झाला. सरांना मेसेज केला.

रात्रीच्या शांततेतलं वीरूपाक्ष मंदिर

“उद्या पहाटे पाच वाजता भेटू.”

उत्सुकता ताणली गेली. पहाटे साडेचारलाच जाग आली. सगळेजण अंघोळ करून तयार झालो. गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी वीरुपाक्ष मंदिरासमोर येऊन थांबलो. रात्रीच्या प्रवासातून नुकत्याच पोहोचलेल्या प्रवाशांची लगबग चालू होती. हंपीमधल्या दिनचर्येला सुरूवात झाली होती. जवळच्या एका चहा टपरी वरून चहा घेतला. चहा टपरीवरच्या आक्काच्या केसांत माळलेल्या फुलांचा सुगंध दरवळत होता. तिची इतक्या पहाटेची प्रसन्न मुद्रा अतिशय सुरेख दिसत होती. ती म्हणाली,” तीन ला उठून चारला चहाची गाडी सुरू करते चार ते सात मी गाडी चालवते नंतर नवरा येतो. तो दुपारपर्यंत थांबतो मी पुन्हा दुपारी येते.” कष्टाला समाधानाची आणि सकारात्मकतेची विलक्षण जोड तिच्या बोलण्यात जाणवली.

शहाजी सर लांबूनच येताना दिसले. भेटीगाठी झाल्या ग्रुपमध्ये आम्ही एकूण सात जण.’ब्रम्हराक्षस’ पुस्तकाचे लेखक ओंकार जोशी, गायक रोहित कुलकर्णी, डॉ. राज, डॉ.प्रणिता आणि आई बाबा.

सगळे लष्करी शिस्तीसारखे वेळेत जमलो. शहाजी सर म्हणजे हंपीच्या वैभवशाली इतिहासाचं,संस्कृतीच चालतंबोलत उदाहरण. इथले दगडधोंड्यांना, मळकट वाटांना, कलाकुसर केलेल्या भिंतींना त्यांचा स्पर्शही समजत असणार..! सतरा वर्षं इथं संशोधन करुन त्यावर पुस्तक लिहणारे, आयुष्य हंपी इतिहास संशोधनाला वाहिलेले सर सोबत असणं म्हणजे किती थोर भाग्य!!

सरांनी ग्रुपच नेतृत्व हातात घेतलं. “आपण समोर पहातोय तो आहे मतंग पर्वत. मतंग पर्वतावर वीरभद्राचे मंदिर आहे. हा पर्वत चढायला बरेच मार्ग आहेत. त्यातल्या त्यात सोपा मार्ग आपण निवडतोय. डोळे उघडे ठेवून चालू नका. आजूबाजूचा अनुभव घ्या. काही अनुभव आयुष्य बदलणारे ठरतात. “

वातावरणात हलका गारवा होता. थंडी असली तरीही ती आल्हाददायक होती. अजूनही अंधारच होता. हौशी पर्यटकांची थोडी बहुत वर्दळ दिसत होती. सरांच्या सूचनांकडे व्यवस्थित लक्ष देऊन ते समजून घेतले आणि त्यांच्या मागोमाग चालू लागलो. पहिल्याच पायरीवर सरांनी मला थांबवलं. आकाशाकडे पहायला लावलं. इतका वेळ बोलताना एकदाही मी आकाशाकडे का पाहिलं नाही याची खंत झाली. जांभळट गडद निळ्या आकाशात पांढऱ्या ताऱ्यांनी सुंदर रांगोळी मांडली होती. मधेमधे लुकलुकणारे तारे विलक्षण भासत होते. गूढतेने भरलेले ते आकाश एखाद्या चित्रकाराच्या पोतडीतून जादुई रंगांची उधळण व्हावी इतके विलोभनीय दिसते होते. चांदण्यांमध्ये चढण करायची ही पहिलीच वेळ. मी डोळे भरून ते आकाश पाहून घेतलं. आताशा सरांच्या बोलण्याचा अर्थ कळायला लागला होता.

पहिल्या टप्प्यातील चढण थोडी सोपी परंतु तेवढ्याच जास्त उंचीच्या पायऱ्या ( दगडांवरील सपाट जागा). त्यामुळे जपूनच चढावी लागत होती. आकाराने प्रचंड मोठे ,एकसंध, मातकट रंगाचे दगड यांची रेलचेल होती. रातकिड्यांची आवाज येत होता. रानफुलांचा मधूर, मोहक सुवास आसमंतात दरवळत होता. फेब्रुवारीचे दिवस.नुकतीच पानगळीला सुरूवात झालेली होती. मध्येच वाऱ्यामुळे पानांची सळसळ, कुठेतरी दगडांना कपारींना घासून सू सू करत जाणारा वारा यांमुळे एक वेगळंच संगीत तयार झालं होतं. छोट्या उंचीची किंवा काट्यांची झाड दाटीवाटीने उभी होती. ती जणू सरंक्षण भिंतीप्रमाणे काम करत होती.

दुसऱ्या टप्प्यामध्ये दिसणारा सुंदर परिसर -मतंग पर्वत

दुसऱ्या टप्प्यातली चढण त्यामानाने पहिली पेक्षा अवघड. आजूबाजूला आधार घेण्यासाठी काहीच नाही. एक उंच शिळा आणि त्यापलिकडे काही दिसत नसे. शिळेला मध्ये मध्ये कपार किंवा चिरा पाडून तयार केलेल्या पायऱ्या होत्या.आकारानेही लहान आणि अरूंद. ज्यात पूर्ण पायही मावणार नाही. ती चढण तर मी बऱ्यापैकी पालथ झोपूनच पार केली. त्या शिळेवर पोहोचलं की पुन्हा दुसरी दुप्पट उंचीची शिळा दिसे. एक शिळा पार केल्याशिवाय पुढे काय याचा अंदाजच येत नव्हता. मध्येमध्ये मी आकाशात पाही. गडद रंग हळूहळू फिकट होत चालला होता. खेळून दमलेल्या तारका मंद होत होत्या. दुसरा टप्पा संपल्यावर चौथऱ्यावर उभं राहून समोर पाहिले. तुंगभद्रेच स्वच्छ,नितळ निळेशार पाणी तिचा वेडावाकडा प्रवाह स्पष्ट दिसत होता. नदीशेजारी असणारे अजस्त्र पर्वत त्यांवरील शिळा धानस्थ मुनींप्रमाणे भासत होत्या. मी तुंगभद्रेला मनोमन नमस्कार केला.

तिसरा टप्पा- अवघड चढण

तिसरा टप्पा बराच अवघड होता. एका बाजूला उंच उंच दगड आणि दुसऱ्या बाजूला खोल, ठाव न लागणारी, काळ्याकुट्ट अंधारात गडप झालेली दरी.मधे एका वेळी एकच पाऊल टाकता येईल अशी दगडी वाट. हा अनुभव मोठा चित्तथरारक होता. जपून पावले टाकत आम्ही श्वास रोखून वाटचाल करत होतो. पुढच्या ग्रुपमधल्या एकाच्या पायाचा धक्का लागून एक दगड खाली पडला. त्या खोल करीत आवाज न करता तो दगड गायब झाला. एका ठिकाणी नव्वद अंशाच्या कोनात वळून वर चढायचे होतं. पाय सटकला तर खाली खोल दरीत कुठे कोसळू यांचा नेम नाही. मी तिथेच थिजून उभी राहिले.ह्रदयाचे ठोके वाढत होते. श्वासाची गती वाढली होती. आत मागे फिरायच की काय असा विचार मनात आला.सगळ्यात मागे असणारे सर दुसरीकडून चढण करून माझ्या पुढे आले. त्यांनी धीर दिला. खाली न पाहता आरामात पाय टाकायला सांगितले. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पाय टाकला आणि ती अवघड चढण पार केली. ती चढण पार केल्यावर मी सुटकेचा निःश्वास टाकला.एक रोमांचकारी प्रसंगाला आताच सामोरी गेले होते. एकामागोमाग एक सगळेजण वर आले. समोरच्या आकाशात निळसर जांभळी छटा उमटली होती. पक्ष्यांची लगबग सुरू झाली होती. दूर कुठेतरी बासरीचा स्वर ऐकू‌ येत होते. हा मार्ग शिखराला लागून असलेल्या सपाट भुभागावर जातो. तिथून पायऱ्यांनी खाली येऊन वीरभद्राचे दर्शन घेतले.वीरभद्राची पूजा कधी पहाटेच नित्यनियमाने होते. दगडी समईतला दिवा मंद तेवत होता. अगरबत्ती आणि फुलांच्या मिश्र सुवासाने गाभारा भरून गेला होता. शिल्पातली ही वीरभद्राची मूर्ती मोहक आणि प्रसन्न दिसत होती. पायऱ्या चढून वर आलो. पायथ्यापासून पंचेचाळीस मिनीटांची ती चित्तथरारक चढण होती.

सपाट भूभागावर बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. पूर्वेकडे तोंड करून सूर्योदयाची वाट पाहणारे बरेच लोक दिसत‌ होते. या भूभागावरून ३६०° तून विजयनगरीचे विलोभनीय दर्शन होते. चारही बाजूंनी असणारे उंचंच उंच शिळांनी आच्छादलेले पर्वत, या पर्वतांनी जणू काही सरंक्षक भिंत बांधलेली आहे. त्यातून नागमोडी वळणं घेत वाहणारी तुंगभद्रा आणि मधे असणारी हिरवीगार शेती. उंचच उंच नारळीची झाडं. डोळ्यात न सामावणारं हे दृश्य. मोठमोठे महाल मंदिर काडीपेटीसम भासत होती. अच्युतराय मंदिर, विठ्ठल मंदिर, लोटस महाल परिसर, कृष्ण मंदिर, पुष्करणी यांचे खांब दिसत होते. मंत्रमुग्ध करणारं ते वातावरण होतं.

वीरभद्र मंदिर- समोर दिसणारा सुंदर नजारा

मी तिथेच एका ठिकाणी बसले. आभाळावरची ती तिरेघी छटा, मधूनच येणारे मोरांचे म्याव म्याव आवाज आणि अल्हाददायक वारा अनुभवत होते. मागेच एक परदेशी मुलगा गिटारावर छानस गाणं वाजवत होता. ते गाणं वातावरणात अजूनच उत्स्फूर्तता आणत होतं. मी शांत झाले. आत्मिक शांतता मी पहिल्यांदाच अनुभवत होते. मी अंतर्बाह्य ध्यानस्थ होऊन बसले. ईश्वराशी किंवा निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे वेगळं काय असतं? श्वासाची गती लयबद्ध आणि शांत होतं होती. चैतन्याची अनुभूती प्रत्यक्ष घेत होते.

सूर्योदय- वीरभद्र मंदिर

मी कितीतरी वेळ एकचित्ताने बसले होते इतक्याच आवाजाने मी तंद्रीतून जागी झाले. पूर्वेकडे सूर्य उगवत होता. गडद निळ्या आकाशात‌ तांबड्या नारंगी रंगछंटा उमटू लागला. ठिपक्यासम भासणारा सूर्य हळूहळू पर्वतामागून वर येऊ लागला. पक्ष्यांचे थवे आकाशात झेपावू लागले. संपूर्ण पूर्वदिशा प्रकाशमान झाली. मी सूर्यदेवतेला मनापासून वंदन केले. सरांनी माहिती सांगायला सुरुवात केली. ठिकठिकाणी धुराचे धुक्याचे लोट दिसत होते. वीरूपाक्ष मंदिराचा कळस प्रकाशात उजळून निघाला. घंटानादाने परिसर दुमदुमून गेला. प्रसन्न मंगलमय वातावरणात आम्ही तिथून परतीच्या वाटेला लागलो.मध्ये एका मुलाकडून चहा घेतला. अठरा वर्षांचा तो मुलगा पहाटेपासून दहा बारा वेळा पर्वताची चढ-उतार करतो. ते ऐकूनही मी अचंबित झाले.

वीरभद्र मंदिराचा कळस आणि त्यासमोरचा सखल भूभाग

उतरण सोपी होती. पावलागणितक आत्मविश्वास होता. इतका प्रचंड आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान मी पहिल्यांदा अनुभवत होते. गूढ भासणारी वृक्षराई आता शांततेत उभी होती. नदीचं स्वच्छ पाणी खळखळत वाहत होते. कडेच्या वेलींवरची पांढरी, पिवळी फुलं आनंदाने डोलत होती. कुठे पक्ष्यांच्या जोड्या घरटी बांधणीच्या तयारीत होत्या तर कुठे फुलपाखरे मनसोक्त बागडत होती. उतरल्यावर मी पर्वताला नमस्कार केला. निरोपाची‌ वेळ झाली. सरांना या अविस्मरणीय अनुभवाचे धन्यवाद द्यावे ते कमीच.

आजही मी ती शांतता डोळे मिटून अनुभव घेते. निसर्ग चोहोबाजूंनी आपल्याला मुक्ततेची उधळून करत असतो. ती आपण अनुभवली पाहिजे. निर्सगाच्या सान्निध्यात असणार समाधान इतरत्र कोठेही नाही. या आठवणींची पुरचुंडी मी सोबत घेऊन जड पावलाने निघाले. उतरताना वाचलेल्या रामदास स्वामींच्या ओळी आठवल्या

कल्पनेचा प्रांत| तो माझा एकांत|

तेथे मी निवांत बैसईन ||

Image source- All images are captured by blogger and are subject to copyright.

भोवरा

भाग -२


“मिस्टर कैवल्य, हा तुमचा फाजिल आत्मविश्वास कंपनीसाठी डोकेदुखी आहे. कधीतरी वास्तवातल्या गोष्टी बोला.
All the motivational quotes and living life theory doesn’t work here.!” बॉस रागाने बोलला.


“ पण सर..!”


“Not a single word. Get out. Understood?” हात टेबलावर आपटत बॉस गुरगुरला.


ओठावर आलेले शब्द गिळून कैवल्य केबिन बाहेर पडला. त्यांच्या मनात एकाच वेळी संताप, खुजेपणा, अपमान अशा संमिश्र भावना होत्या. फायली टेबलवर फेकून तो खुर्चीत स्तब्ध बसला.


एसीतल्या थंड वातावरणातही इथली डोकी कायमच गरम असतात. चकाकणाऱ्या इमारतींच्या झगमगाटात कितीतरी स्वप्न आणि कल्पना नफा तोट्याच्या भानगडीत बंदिस्त होत असतील नाही.?


आतापर्यंत तो‌ प्रामाणिकपणे काम करतच होता. बढती वैगेरे मिळत नव्हती. त्याच्या साच्याबाहेरच्या विचारांमुळे ‌कंपनी कल्पनांना वास्तवात आणायला घाबरत होती. दिवसेंदिवस घुसमट वाढत होती. कामात मन लागत नव्हतं.


संध्याकाळी घरी आला तर घराला मोठं कुलूप. मनिषा अशी न सांगता कधीच जात नव्हती. गोंधळात तिचा फोन मिस झाला का चेक करायला त्याने मोबाईल उघडून पाहिला. पण तिचा कोणताच निरोप नव्हता. थोडंसं आश्चर्य‌ वाटून त्याने दरवाजा उघडला.नऊ वाजून गेले तरी मनिषा आली नव्हती. कैवल्यने फोन करायला मोबाईल हातात घेतला. इतक्याच दाराची बेल वाजली. त्याने दरवाजा उघडला.मोगऱ्याचा धुंद करणारा सुवास खोलीभर पसरला.


“आई, कुठे होतीस तू?”
मनिषाच्या केसात माळलेला गजरा विस्फारून पहातच तो म्हणाला.


“अरे नाटकाला गेले होते.काय सांगू तुला काय सुरेख नाटक आहे!”


“कोणाबरोबर?”


“अरे ते आपले जाधव.”


“कोण ?ते टकले? लेखक म्हणवतात स्वत:ला ते?” किंचीत असूयेने तो म्हणाला.


“ म्हणवत नाही. आहेतच ते.” मनिषा उत्तरली.


“ असो. मी खीर केली ते. वाढू?”


“खरतर खाऊन आले आहे मी. पण ठीक आहे. चव घेऊन पहाते.” आळस देत मनिषा म्हणाली.


कैवल्यचा चेहरा उतरला. आपल्या माणसासाठी आपण काही करावं आणि त्याने तटस्थपणे उत्तर द्यावं, केवढे हे दु:ख. जेवताना मनिषाची अखंड बडबड चालूच होती. कैवल्य त्या शब्दांच्या ओझ्याखाली दबून बळेच जेवण करत होता.



पलंगावर पडल्या पडल्या छताकडे पहात तो विचार करत होता. ‘आई इतकी बदलली कशी?? याआधीही तिला बरेच मित्र होते. पण ती अशी कुणासोबतही कामाशिवाय गेलीच नव्हती. आपण वेळ द्यायला कमी पडलो का?? आई आपल्या मित्र मैत्रिणींना सांभाळून घेते मग तिलाही मित्र असायला आपला आक्षेप का? एका विशिष्ट वयानंतर भावनिक आधार फार जास्त गरजेचा असतो. आपल्यामुळे आधीच तिची फरफट झाली असताना आता त्यात काही गैर वाटायला नको.’ विचारांच्या चक्राबरोबर त्याच्या मनांची असंख्य कवाडं उघडझाप होत होती. रात्री कधीतरी उशीरा त्याला झोप लागली.


मध्यंतरीच्या काळात त्याने बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते.आज अचानक त्यांच्याकडून त्याला उत्तर आलं. परदेशात नोकरी होती. तिकडे जायचे की नाही या विचाराने तो गोंधळात पडला. मित्र आपापल्या ठिकाणी स्थिरस्थावर झाले होते‌. आनंदात समाधानात होते का माहित नाही. वरवर दाखवायला सगळेच आनंदात पण खोलवर भळभळणारी दु:ख कुणाला कळणार!

आता कुठे नुकतीच श्रावणाला सुरूवात झाली होती.हलक्या सरी आणि हिरवळ.सगळ किती प्रसन्न ! मनिषाने लावलेला मोगऱ्याचा वेल कैवल्यच्या गॅलरीपर्यंत पसरला होता. कैक रात्री त्याने या धुंद सुवासात शांत गाणी ऐकत घालवल्या होत्या. फुलपाखरांचाही वेल दारात लावायचा म्हणून तो किती रुसुन बसला होता लहानपणी ! कशीबशी समजूत काढत निळ्याभोर गोकर्णाची फुलं फुलपाखरू म्हणून कुंपणाभोवती लावली होती. सगळं आठवून कैवल्य मनातच हसला.

दारासमोर अचानक एक पांढरीशुभ्र गाडी उभी राहिली. ओळखीचीच होती. गाडीतून धारा, तिचे आई-वडील उतरले.


“ही आत्ता अचानक का आली न कळवता?” आश्चर्य वाटून कैवल्य पटापट पायऱ्या उतरून खाली गेला.मनिषा ने दार उघडले.


“अरे व्वा, या या शोभना ताई..!”


शोभना, धारा आणि तिचे बाबा प्रकाश सोफ्यावर बसले.कोचावर अस्ताव्यस्त पडलेली मासिकं कैवल्यने जुळवून ठेवली. समोरच्या भिंतीवर असणारं तैलचित्र भिंतीवर शोभून दिसत होतं. धारा आणि कैवल्यने मागच्या एका ट्रीपवरून ते आणलं होतं. दोन सारखी तैलचित्र..एकमेकांत गुंतलेल्या फुलांचे. दोन्ही घरात ती तैलचित्र दिमाखात मिरवत होती‌. प्रकाशराव काही समजल्यासारखं हसले. चहा बिस्किटे झाल्यावर मनिषा ही त्यांच्यात येऊन बसली‌. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शोभनाने मुद्द्याला हात घातला.


“मनिषा, आपली मुलं मोठी झाली आहेत.पायांवर उभी राहिली आहेत. योग्य वेळेत योग्य गोष्टी झालेल्या बऱ्या.”


“मला समजलं नाही.स्पष्ट बोलशील?” मनिषा गोंधळून म्हणाली.


“ हे बघा वहिनी, एकदा अक्षदा डोक्यावर पडल्या की बापाचं ओझं कमी होतं. त्यात मुलीला ओळखीच्या ठिकाणी दिलं म्हणजे मनावरचं दडपण अजून कमी होतं.” प्रकाश म्हणाला.


मनिषा समजल्यासारख मान डोलावत हसली.


“तर… कैवल्य आणि धारा लहानपणापासून एकत्र वाढलेत. आपली कुटुंबही ओळखतात. आमची इच्छा आहे कैवल्य आमचा जावई व्हावा.”एका दमात प्रकाशाने सांगून टाकलं.

मनिषा उठली.
“तोंड गोड करायला काही तरी घेऊन येते सगळ्यांना.”

वातावरणातला ताण निवळला. आनंदाचे चेहरे फुलले. धाराने चोरटा कटाक्ष कैवल्य कडे टाकला. कैवल्यचा चेहरा पांढराफटक पडला होता.


“जा तुम्ही दोघं जरा बोलून या आम्ही पुढच्या गोष्टी ठरवतो.” शोभना म्हणाली.


कैवल्यच्या आयुष्यात अचानक वादळ आलं होतं. तो जडपणाने पावलं टाकत खोलीत आला.पाठोपाठ धाराही आली. धारा त्याला बिलगत म्हणाली,
“आज मी खूप खूश आहे कैवल्य..खूप खूप!”


त्याच्या केसा़तून आणि चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत ती म्हणाली.
“ एखाद्या स्वप्नासारखं वाटतय आज. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.”


मनाचा हिय्या करून कैवल्यने तिचा हात सोडवला. तिला दूर करत त्याने लांब श्वास घेतला.


धारा डोळे विस्फारून पहातच राहिली,


“कैवल्य??”


“धारा, जे चाललंय ते खूप गडबडीत आणि अनपेक्षित आहे.”


“काय अनपेक्षित कैवल्य? लहानपणापासून असंच होतं. तू माझा नवरा होणार, तसंच वाढलोय आपण.”


“ते लहानपण होत. आता आपण मोठे झालो.”


“तू काय बोलतोय हे?”


“मी बरोबरच बोलतोय धारा. जे चाललंय चुकीचं आहे.”


“क..क.. कैवल्य.. तुला दुसरी कुणी आवडते का?”


“नाही धारा..”


“मग तरीही…माझ्यात काही कमी आहे का??”


“तू अतिशय देखणी, स्वावलंबी आणि प्रेमळ आहेस.”


“मग तरीही?”


“नाही होऊ‌ शकत धारा..मी तुझ्या योग्य नाही.”


“हे तू ठरवितो योग्य, अयोग्य?”


“ कदाचित आधीच ते ठरलयं‌.”


“आपल्यात जे होतं ते काय होतं?”


“काळजी, मित्रप्रेम, जबाबदारी होती. याव्यतिरिक्त मी तुला कधी वेगळ्या नजरेने पाहिले नाही आणि कधी स्पर्शही केला नाही.”


“तू फसवलस मला‌..” धारा हुंदके द्यायला लागली.तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाट वाहू लागला

. कैवल्य हतबलतेने तिच्या कडे पाहू लागला.
“धारा मी काय सांगतो ऐक.”


“आता अजून काय ऐकायचं राहिलय? “ डोळे पुसत दरवाजा उघडून धारा धावत खाली आली. खालून येणारा हसण्याचा आवाज अचानक बंद झाला. कैवल्य खाली गेला तोवर धारा पाठोपाठ तिचे आई-वडील ही बाहेर गेले. गोंधळून मनिषा आत बाहेर बघत राहिली.


अपराधी मनाने हळूहळू पावलं टाकत तो खोलीत आला. एकाच वेळी संताप, दु:ख, अपराध अशा भावनांनी त्याच मन आक्रंदून गेलं. त्याने डोळे मिटले. त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. मनिषा आत आली. तिच्या येण्याची चाहूल लागताच कैवल्य उत्तरला,
“मी केलं ते योग्य केलयं आई. मी लग्नाला नकार दिला.”


मनिषा मटकन खाली बसली. तिला काही सुचेना. डोकं धरून ती कितीतरी वेळ तशीच बसली. कठड्यांचा आधार घेत ती खाली आली. तिने एक फोन लावला.


कैवल्यच्या डोळ्यासमोर मोठा डोह येत होता. खोल, गहिरा, काळाकुट्ट डोह. ज्यात तो बुडत चालला होता. हातपाय ही चालत नव्हते. तो काठाकडे पहात होता. धारा, आई , काका काकू, काठावरून स्तब्धपणे पहात राहिल्या. कैवल्य त्या खोल गर्तेत बुडत राहिला असहाय बनून.

कानावर हुंदके आल्यावर कैवल्यने डोळे उघडले. किती वेळ तो तसाच पडून होता. डोळे चोळत तो उठला. कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. पायऱ्या उतरून खाली आला. मनिषा सोफ्याला टेकून हुंदके देत होती. तिच्या समोर लेखक जाधव आणि अजून एक बाई बसली होती. ती कोण असावी बरं? कैवल्य विचार करु‌ लागला. वातावरणात तणावपूर्ण शांतता होती. कैवल्य आल्यावर मनिषा उठून आत निघून गेली. जाधव म्हणाले,
“कैवल्य बस इथे. वीणा जरा चहा कर बरं. मनिषाला आणि यालाही. जेवणाचही बघं. सकाळपासून दोघांनी काही खाल्लं नाही.”


थोडीशी स्थूल, गव्हाळ, गोलाकार लालसर टिकली आणि अंबाडा घातलेली वीणा कीचनमध्ये निघून गेली.
जाधव कैवल्य शेजारी बसले.
कैवल्यच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले,
“बाळ तू पुन्हा विचार करावा असं वाटतं.” कैवल्यने तिरस्काराने त्यांच्या कडे पाहिलं.


“मी समजू शकतो. मी लुडबुड करणारा कोण पण केवळ मनीषा बाईंसाठी म्हणून तुझ्याशी बोलतोय. त्यांना काळजी वाटतेय तुझी.”


“माझा निर्णय झालाय काका त्यात बदल होणार नाही.”


“बरं ती नाही तर दुसरी मुलगी?”


“काका…!” करड्या आवाजात कैवल्य म्हणाला.


जाधव गप्प बसले. मनिषा बाईंचा पोरगा इतका उद्धट असेल असं त्यांना वाटलच नव्हतं. कैवल्यच डोकं भणभणायला लागलं. वीणा ट्रे घेऊन आली.


“ही माझी बायको वीणा.” जाधव कैवल्यच्या हातात कप देत म्हणाले. तो स्तब्ध होऊन पहात राहिला.’ उगाचच आपण आईवर शंका घेतली.’जाधव मनातलं कळाल्यासारख हसले.


त्यादिवसानंतर धाराने कधीच फोन उचलला नाही. मनिषा खळखळून हसली नाही. अमांगल्याच सावट जणु भोवती फिरत होतं.नात्यांत वितुष्ट आले होते. मोगऱ्याचा बहर संपला होता. धाराने लावलेला प्राजक्त तटस्थपणे पहात होता. एकटेपणाच्या झालरीला आता फक्त दुःखाचे बोचरे किनारे होते.

क्रमशः

All rights reserved.

भोवरा

भाग-१


“ थांब, बस इथे, मला बोलायचं.” मनिषा सोफ्यावरून पुढे सरकत म्हणाली. दरवाजातून येता येता कैवल्य थबकला.
“आई, आपण नंतर बोलू शकत नाही का?” हाताशी चाळा करत तिच्याकडे न पहाताच तो म्हणाला.
“नाही, हे आत्ताच बोलायला हवयं. बस.” रोखलेल्या नजरेने तिने कैवल्यला इशारा केला.
“ मी थकलोय, प्लीज.” ताडकन पाय उचलून तो निघून गेला.दरवाजा आपटल्याचा धाडकन आवाज आला.राग आणि हताशपणाने उसासे टाकत मनिषाने घट्ट डोळे मिटुन घेतले. तिच्या चेहऱ्यावर वेदनेची रेषा स्पष्ट दिसत होती.
कैवल्यने खुर्चीत बॅग टाकून दिली. गादीवर पडून तो फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक पहात राहिला. गोल गोल गोल..हे चक्र असणं अव्याहतपणे सुरू राहणार.मनिषा काय बोलणार हे त्याला ठाऊक होतं. इतके दिवस ती आडून आडून विचारायची. पण आता समोर बसूनच काय तो सोक्षमोक्ष लावायचा अस तिनं ठरवलं होतं. कैवल्यची तयारी नव्हती. ‘आपण फारच तिरसट वागलो का? असं वागायला नको होत,’मनाशीच विचार करत कैवल्य कितीतरी वेळ पडून होता.


मनिषा.

तरुणपणी बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये काम करायची. मोठी लोभस पोरं. लांबसडक पाठीवर रूळणारी केस, चोपून नेसलेली कॉटनची साडी करारीपणा ओतप्रोत भरलेला. माधवशी लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींना मर्यादा येत होती. माधव ऑफिसमधून आल्यावर गॅलरीत सिगारेट ओढत बसायचा.फार कमी बोलणं.मनिषाची घुसमट होत होती. त्यात अनिच्छेने दिवस राहिले. कैवल्य झाल्यावर तरी तो बदलेल अशी आशा होती पण तीही फोल ठरली. कैवल्य दोन वर्षाचा झाल्यानंतर एक दिवस माधव अचानक निघून गेला. कुठे, काय काहीही न सांगता. पोलिसांत तक्रार करूनही काहीच हाती आलं नाही.
दोन तीन महिने असेच गेल्यानंतर मनिषाने कंबर कसली‌.ज्याने कधीही आपल्या भावनांची कदरच केली नाही त्यांच्यासाठी अश्रू ढाळूनही काय उपयोग.

एकवेळ भांडून माणूस काही संवाद साधतो. त्याच्या अस्तित्वाची जाणीव तरी असते. पण मौनात धुंद असलेल्या माणसाला वाचा कशी फोडणार?

झालं ते ठीक झालं. असं मानून ती उठली. एका ठिकाणी कंपनीत नोकरी करायला लागली. कैवल्यला सांभाळण, कोडकौतुक करणं, आधीच्या संस्थांमध्ये काम करणं तिचं आयुष्य आता कुठे सुरळीत चाललं होतं.


दारावरच्या बेल ने मनिषाची तंद्री भंग पावली. डोळे चोळत तिने दरवाजा उघडला. दारात धारा उभी.
“ काकू, झोपमोड केली का?”
“नाही गं, ये आत ये. बसल्या जागी डोळा लागला.सात वाजले तरी कळलंच नाही.” धारा आत आली. मनिषा तोंडावर पाणी मारून चहा ठेवायला निघून गेली.
“काकू, कैवल्य आहे का गं? बाहेर गाडी तर दिसतेय त्याची,?” कोचावरची मासिकं चाळत ती म्हणाली.
“रुममध्ये असेल ग. पहाते का? आण बोलावून. सगळ्यांना चहा आणि नाश्ता करते.” मनिषा उत्तरली.


धारा वर आली. तिने दरवाजा वाजवला. बऱ्याच वेळाने कैवल्यने दार उघडलं. त्याच्या कानपिचक्या घेत तिने विचारलं,
“काय अंधारात बसलाय? आज आपण सगळे भेटणार होतो. विसरलास का?” त्याला ढकलून ती आत आली.
कैवल्यने आळस दिला. तोंड धुवून तो तिच्यासमोर बसला.
“चल खाली. काकू वाट बघतेय चहासाठी.” त्याला हाताला धरून ओढत ती खाली आली.

कैवल्य अपराध्यासारखी मान खाली घालून बसला. मनिषा चहा आणि गरम गरम उपमा घेऊन आली.
“कैवल्य, बिस्कीट देऊ का?” मनिषा ने विचारलं.
त्याने मानेनेच नकार दिला.चहापाणी झाल्यावर ते दोघे बाहेर निघून गेली. मनिषा तिच्या कामात गुंतून गेली.
रात्री बऱ्याच उशीराने कैवल्य घरी आला. चावीने दार उघडून तो आत आला. मनिषा केव्हाच झोपी गेली होती. त्याच ताट किचनवर झाकून ठेवलं होतं. त्याला मनोमन वाटलं, आईशी आज असं वागायला नको होतं.


बाबांचा चेहराही त्याला आठवत नव्हता. तेव्हापासून आईचं त्याची बाबा झाली होती. कुठे ही काही कमी पडत नव्हतं.पण चार सहा महिन्यांपासून फारच ताण निर्माण झाला ‌होता. याची सुरुवात नक्की कशापासून झाली? केव्हापासून? आईने लग्नासाठी पिच्छा पुरवल्यानंतर? धाराला आपल्यापासून मैत्रीपेक्षा अधिक काही हवं आहे हे जाणवल्यावर की विक्रांतचा तो गोरा देखणा चेहरा आठवत राहिल्यावर. ?? त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. तो मटकन कोचावर बसला.


परिस्थिती समाजविरोधी असल्यावर किती संघर्ष करावा लागतो ना? आधी समाजाविरुद्ध ,घटनेविरुद्ध ,घरच्यांसोबत, इतकंच काय स्वत:चा स्वत:शी. हा स्वतःचा संघर्ष मोठा वेदनादायी आणि कठीणही. दोन ध्रुवावर हेंदकाळणाऱ्या दोन भिन्न मनांना समतोल साधत बांधून ठेवण किती कठीण! त्यातही पाय न घसरता तितक्याच ताकदीने उभा राहणं हे ही दिव्यच..

क्रमशः

क्षणभंगूर

” एअर इंडिया विमान क्रमांक… मुंबई ते दिल्ली तीन तास उशीरा उड्डाण करेल.”

प्रवाशांकरिता असलेली सूचना ऐकून ती त्रासली.

“याला काय अर्थय?? तीन तास उशीरा???”

तिच्या शेजारीच बसलेला मुलगा हसला. तिने रोखून त्याच्याकडे पाहिलं.

त्याने मुकाट्याने मान दुसरीकडे वळवली. आता तीन तास काय करायचं या विचारानेच ती विचलित झाली. पर्समधील वही काढून ती काही लिहायला सुचतयं का पहात होती. शिर्षक टाकलं

‘ भरकटलेलं उड्डाण’

आपल्याकडे रोखलेल्या नजरेने ती अस्वस्थ झाली. शेवटी भीती प्रत्येकालाचं वाटते. त्या नजरेने आरपार आणि घट्ट कोंडलेल्या मअनोळखी नजरेचीनाचा वेध घेऊ नये,असं‌ वाटतं. गुपीतं ही अशी सहज कुणाच्या हातात पडली की त्याचा उपयोग भावनांच्या विरोधात होतोच मग विश्वासाची लक्तरं वेशीवर टांगली गेली समजायचं !

ती त्याच्याकडे पाहून कसनुसं हसली. त्याचं हसणं
फारचं मधाळं होतं. तिच्या मनातली अढी थोडी सैलसर झाली. हसणं माणसं जोडतं, काळीज घायाळ करतं आणि अस्तित्वाची जाणीव करून देतं. ती हातातल्या पेनाशी ती खेळत बसली. नेमकं वेळेला काही आठवत नाही लिहायला, तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या.

“तुम्ही लिहीता??” त्याने थोडं घाबरत विचारलं.

“सगळेचं लिहितात. लहानपणापासून शिकवतातच ना??”

“न्.. नाही..म् म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही लेखिका आहात का?”

“नाही. मला जे वाटतं ते उतरवते कागदावर.. गरळ ओकणं म्हणू शकता..”

“ओह्..सॉरी..मी सहजच बोलून गेलो.” काहीसं अवघडून तो दुसरीकडे बघू लागला.

आपली चूक लक्षात आल्यावर ती म्हणाली,

“तुम्ही पण याच विमानाने जातायं का? उशीर झालेल्या??”

“नाही..मी बॅंगलोरला जातोय. माझी फ्लाईट रद्द झालीये. आता पुढची आहे ती बऱ्याच उशीरा आहे.”

“ओह् अच्छा. आयटी मध्ये का?”

“हो.. तुम्ही?”

“मी पुरातनशास्त्रात पदवी घेतली आहे. दिल्ली ला एक प्रोजेक्ट साठी जातेयं.”

“क्या बातं..!”

ती हसली. या व्यक्तीपासून काही धोका नाही, असं तिला वाटलं. तीन तासांत थोडंफार बोलायला कुणीतरी मिळालं तितकाच टाईमपास.!

“तुम्ही गरळ ओकता म्हणजे काय करता?” त्याचा प्रश्न.

“हाहाहा…म्हणजे मला जे जे मनात विचार येतात ते ते मांडते.. प्रत्येकवेळी आपण सगळ्या गोष्टी लोकांना सांगू शकत नाही किंवा कुणी ऐकून घेऊ शकत नाही.”

“जसे की??”

तिने त्याच्यासमोर डायरी धरली. सुबक अक्षराने तो मोहून गेला.

‘ पाठमोऱ्या तुला जाताना पाहून

थोडं थांब म्हणावं वाटलं

मनातलं गुपित सारं

सांगावसं वाटलं..!’

“व्वा… प्रेमकविता …मस्तचं..!” तो‌ वही तिच्याजवळ देत म्हणाला.

“धन्यवाद. “

“स्वानुभव?? “

“नाही हो…लोकांच्या अनुभवातून लिहायचं.”

“अरे तुरे बोललीस तरी चालेल.”

“मी सगळ्यांशी असचं बोलते.”

“आदरार्थी की अपमान करायच्या हेतूने.?”

“नाही.. आदरार्थीच.”

“राजघराण्यातील आहात का??”

“नाही हो. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी आदराने बोलावं.”

“मोठ्या?? मी मोठायं?? कशावरून?”

“हाहाहाहा…हवेत गोळी मारली.”

“काय गोळी मारली?”

“तिशी पस्तीशीचे असाल!”

” एकोणतीस..! इतका वयस्कर दिसतो का मी?”

“तेच ते एकोणतिशी तिशी. जे काही असो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात.”

“तुझं वय काय?”

“लोकांच्या नुसार माझं वयं बदलत जातं”

“म्हणजे.?”

“सव्वीशीपासून पस्तिशीपर्यंत!! कधी कधी माझाच गोंधळ उडतो खरं वयं काय??”

“लोकांना दूर ठेवायची आयडिया आहे का ही?? छान आहे.”

“नाही हो. मी वयाचा गैरसमज काढत बसत नाही. उगाचंच फाटे फुटतात.”

“मिस्टीरियस !”

“होय. काही अंशी चांगलं असतं ते.”

“ओह्. मला देखील कुणाचं खोदून काढायला आवडतं नाही. अपेक्षा करू नका हा माझा नियम आहे.”

“तसही नाही.”

“मग ?”

“सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी माहित असायला हव्यात अशी आपल्या समाजाचा अट्टाहास असतो. आणि सगळ्या गोष्टी फार थोड्या लोकांना माहिती असणं आवश्यक, असं माझं मत आहे. अनलिमिटेड ॲक्सेस इज ए की ऑफ हॅपिनेस!!”

“मी याबाबत असहमत आहे. ज्या लोकांनी समाजात पारदर्शकता आणि समानता आणायचा प्रयत्न केला त्यांच्या मताच्या विरूद्ध आहे हे. विषय भरकटतोय इथे. सॉरी.”

“नाही नाही. थांबा मला काय सांगायचं आहे, मी काय करते , कुठे रहाते, माझ्या आयुष्यात काय चालू आहे यावरून लोक मला पारखून घेतात आणि त्यानुसार माझ्याबद्दल मत तयार करतात. पारदर्शकता विचारांची असावी, असं मला वाटतं. कुणाचीच वैयक्तिक आयुष्य तितकी सुखाची आणि ऐशारामी नसतात. वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचा एक स्तर ठरवून त्यानुसार व्यक्तीची लायकी काढणं पटत नाही.”

“ओह..बरोबर आहे.म्हणूनचं मी म्हणालो मी कोणाचं‌ काही खोदून काढतं नाही. वय विचारल्याबद्दल माफी असावी.”

“मी सर्वसमावेशक बोलले. तुम्हालाच उद्देशून नाही. आणि माझं वय सत्तावीस आहे.”

“अच्छा..पण हे सांगायला माझ्याकडून प्रेशर केलं गेलं नाही ना? कधी कधी आपण दुसऱ्यावर किती दबाव आणतो ते लक्षात येत नाही.”

” नाही हो. अजिबात नाही.”

“पण हे सव्वीस ते पस्तीस अशी वयोमर्यादा का?”

“कारण कुणाला मी फार तरुण वाटते. अगदी बारावी पास..कुणाला वाटतं खूप शिकली मग तिशी तर नक्कीच असेल आणि लग्न झालं नाही अजून म्हणून अजून भुवया उंचावतात.”

“अरे बापरे…मी त्या जागी असतो तर एवढ्या मानहानीने हॉस्पिटलमध्ये भरती झालो असतो. मुलींना कशाकशाला सामोरं जावं लागतं..औघड आहे.”

“हाहाहा…मी लोड घेत नाही इतका..”

“लग्न का नाही केलं?? सहजच विचारतोय.”

“मी त्याबाबत आळशी प्राणी आहे.”

“आळशी काय? पार्टनर असावा असं तुला वाटतं नाही?”

“वाटतं पण मला हवा तसा मिळणं अवघड आहे.”

“मी स्वच्छंदी आहे. स्वच्छंदी पाखरू पिंजऱ्यात राहत नाही.”

“म्हणजे?”

“व्वा.”

“हममम्..वेळ काय झाली?”

“आताशी एक तास सरला आहे. अजून दोन तास बाकी आहे.”

“वेळ नावाचं गणित किंवा दिवस मोजणं मला कायम आकर्षित करत आलयं.”

“बापरे…”

“वेळ हा न संपणारा विषय आहे. असून नसल्यासारखे आहे तो.”

“पण वेळ मोजायचा का?? तिथून सुरुवात होते.”

“हवं तेव्हा मोजावं. उगाच त्याच्यावर बंधन कशाला??”

“पण वेळ निर्जीव आहे ना?”

“वेळ सजीव आहे. त्याशिवाय का आठवणी ताज्या राहतात??”

” मला अशा सिरियस गोष्टींची भीती वाटते यार…”

“हाहाहा..सॉरी…मी अचानक सिरियस होते. दुसऱ्या विश्वात जावून पोहोचते.”

“आता कोणत्या विश्वात आहेस.‌?? तिथला सुगंध घेऊन येशील मला?”

“नाही..”

“का ?”

“ते माझ्याजवळ राहिलेलं बरं.. आपल्या गंभीरतेचा किंवा दु:खाचा गंध दुसऱ्याला देऊ नये.”

“असं एकट्याने सुद्धा सहन करु नये.”

” अ…म्…कॉफी घेणार?”

“आणतो… बसं..”

गरमागरम कॉफीचा कप त्याने तिच्यासमोर मांडला.

” हे घे..”

“थॅंक्स”

“कोणती पुस्तकं आवडतात वाचायला?”

“सगळीच..कथा कादंबरी नाटक ललित कविता…”

“विषय छान बदलतेस तर!”

“कोणता?”

“मघाचा…प्रेमात वैगरे आहे का?”

“नाही रे…”

“इतकं भावनाप्रधान आणि विषय थांबवायचं कौशल्य त्यातूनच येतं. “

“असेलही…पण इथे ते लागू होत नाही.”

“डोळे आणि बुद्धी एका वेळी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले की खोटं समजावं.”

“म्हणजे…”

“काही नाही.”

” तू सुद्धा लिहीतो का?”

“हाहा माऊली…असं नाही हो काही..”

“माऊली?”

” हे विश्वची माझे घरं…सगळी आपलीच माणसं..आपलेचं नातेवाईक.”

“नातेवाईक?”

” बोलण्यात गुंतलोय आपण…अनोळखी असूनही. म्हणून शब्दांनी जोडलोय.”

“बरं…”

“खरं..”

“मस्करी करतोय ?”

“अजिबात नाही.”

“चांगुलपणाची पट्टी बांधलीये डोळ्यांवर?”

“कशासाठी,?”

“अंधारात चाचपडलेला माणूस कुठेही चालू शकतो न धडपड्या.तसं दुःखें भोगलेला माणूस चांगलाच वागतो.”

“लेखिकेशी बोलण्याचं थ्रील मात्र सेक्सी असतं‌. इतक्या वन लायनर्स मी पहिल्यांदा ऐकतोय.”

“हाहा…आणि तितकंच हॉररसुद्धा”

“घाबरवतेय?”

“तसं समजं.”

” तू स्वत: घाबरतेय.”

“काहीही”

“इतकं कोषात राहू नये माणसाने…किती भावना कोंडून वरवरचं जगतेयं.”

“असं तुला वाटतयं‌.”

” झालं..खोटं तर खोटं..पण इतकं पुस्तकी का वागतेय. आतून एक बाहेरून एक. सांगायचं तर तुला खूप काही आहे, पण अनोळखी म्हणून टाळतेय..खरं ना?”

” पण सगळ्याच गोष्टी का सांगाव्या?? आणि तुझ्यावर विश्वास का ठेवावा?

“कारण कधी कधी अनोळखी जागा माणसं व्यक्त होण्यासाठी योग्य असतातच. त्यांना पार्श्र्वभूमी माहिती नसते. ती तटस्थ असतात.”

“………….”

“आणि मी तुला पुन्हा कधी भेटणारही नाही.त्यामुळे माझ्याकडून काय धोका?”

“………..”

“असो..”

“एका मुलावर प्रेम आहे. पण लग्नासाठी तयार नाही. जर पुढे काही होणार नव्हतं, भूमिका नव्हती तर प्रेमाचा अट्टाहास कशासाठी?? चिडचिड होतेय. तणाव येतोय.”

“परिस्थितीने हतबल असेल. आणि न घडणाऱ्या गोष्टी लवकर झटकून मोकळ्या व्हाव्यात. नाही तर त्या पोखरुन काढतात आयुष्य.”

“पण त्याला दोषी मानावं?”

“प्रेम असेल तर तो तुला कधी अंतर देणार नाही. पण भावनेच्या भरात निर्णय घेऊन अंतर दिलं तर इथपर्यंत सोबत होती मान्य करावं आणि पुढे चालावं.”

“मग माझ्या भावनांचं काय?”

“भावना आधी तीव्र असतात नंतर सौम्य होत जातात. विसरशील सगळं हळूहळू.”

“दुसऱ्याशी लग्न केल तर नवऱ्याशी प्रतारणा होणार नाही का?”

“अजिबात नाही”

“कसं??”

“कारण तू त्यावेळी स्वतंत्र असशील. कालांतराने प्रेमही होईल. पण लग्नानंतर तू आधीच्या प्रेमाचाच जपनाम केलास तर ती प्रतारणा ठरेल.”

” थोडं थोडं पटतंय तुझं‌..”

“एका वेळी खूप प्रॉब्लेम आले की सुटे करून ठेवायचे नाही तर गुंता होतो.”

“थॅंक्स..तू खूपच चांगला आहे.”

“आणि तू खूप अवखळ पण निरागसं.!”

“फ्लाईटची अनाउन्समेंट झालीये. येते मी..”

“असचं अर्ध्यावर सोडून..??”

“हो…”

“पुन्हा भेटशील??”

“माहित नाही..”

“तिथे जाशील तिथले सुगंध जमा करून ठेवं..मला कधी भेट झाली तर दे…”

“प्रयत्न करेल..”

“ओळख तरी सांगशील?”

“नावातं काय आहे?”

“आठवणं म्हणून..”

“रजनी…”

“चांदणं तुला भरभरून सौंदर्य देवो.”

“तुझं??”

“चिखलातही उमलू पहाणारा..”

“मिस्टीरियस…”

“होयं…”

“येते… बोलून छान वाटलं.”

“मलाही..”

“बाय…”

“हमम्”

ती पाठमोरी वळून निघून गेली.

बाकावर दुमडलेल्या डायरीतलं पान विरहाने फडफडलं..

  • समाप्त

खेकडा

भाग-२

रीतच आहे ही. प्रत्येकाला आकाश हवं असतं. स्वत:चं राज्य असणारं, स्वत:च्या अधिपत्याखाली असणारं. भले ते आभासी असो, अनाकलनीय किंवा अशक्य. प्रत्येक वेळी त्या आकाशात चंद्र तारे असतील असं नाही. पोकळी मात्र असतेच; अखंड, काळीकुट्ट, अस्तित्वहीन करणारी.शून्य पोकळी..!’


पायावरून सरकन् गुळगुळीत काही गेल्यावर श्रीपादने पाय पाण्यातून बाहेर काढले. बऱ्याच वर्षांनंतर तो ओढयाच्या काठी बसला होता. शिक्षण, नोकरी यांमुळे गावी यायला फारसा जमायचं नाही. जमलं तरी वेळेअभावी इतर काही करणं अशक्य. वेळेची आणि जबाबदारीची भिंगरी पायाला बांधली की तिच्या गिरकीनुसारच तोल सांभाळावा लागतो. नाही तर कपाळमोक्ष ठरलेलाच!


आता ओढ्यालगत ती दाट झाडी नव्हती. पोरांचा कलकलाट नव्हता. नितळ पारदर्शी पाणी नव्हतं की तशीच माणसं नव्हती. सगळं काही गडद, उथळ आणि छटांमध्ये विभागलेलं. माणसांचे स्वभावही तसेच. हल्ली मतलबीपणा उजळपणे दाखवतात हेच काय ते नवीन. पायात चपला सरकवत श्रीपाद विमनस्क अवस्थेत झाडाच्या बुंध्यापाशी जाऊन बसला. फोनची रिंग वाजली.


‘कविता कॉलिंग.’ स्क्रीनकडे बघत त्याने तोंड वाकडं केलं.रिंग वाजून फोन बंद झाला. होय नाही करत त्याने पुन्हा फोन केला. फोन उचलला गेला.


“कुठेय तू श्री?” त्रागा करत कविता उत्तरली.


“गावी. “श्रीपादचे तुटक उत्तर.


“तुला सेन्स नावाचा प्रकार आहे की नाही.? काय ठरलं‌ होतं? तू मला दोन दिवसांत फोन करणार. तीन दिवस होऊन गेले तुला जरा काही वाटत नाही?” कविताचा पारा चढलेला.


“कामात होतो. वेळ मिळाला नाही.”श्रीपाद मातीत बोटाने नक्षी काढत उत्तरला.


“आपल्या आयुष्यापेक्षा कसलं मोठं आलयं काम?” कविता.


“………..”


“आधी तर फार प्रेम होतं रे..?का दिखावा सगळा? आता बोलायला वेळ नाही.” कविताचे शब्द धाडकन कानावर आदळले.


मोठा श्वास घेत श्रीपाद उत्तरला.
“ते प्रेम होतं. त्या भावना होत्या. त्याला बंधनं नव्हती. तू कलम अटी लावल्या. तू बंदिस्त केलं प्रेम. कोरडं आणि शुष्क.आणि हो माझा विचार झालाय. माझा नकार आहे. इथेच थांबू. तुझ्या चौकटीत बसेल असा तू शोध. गुडबाय.”

“श्री…”अस्पष्ट हुंदका कानी पडताच फोन कट झाला.


श्रीपाद डोकं धरून शांत बसला. त्याच्या डोळ्यांत पाणी तराळलं. कविताने त्याला ‘मी, मुंबई किंवा तुझं कुटुंब दोन्ही पैकी एक निवड”, अशी अट घातलेली. तो खेकड्याने नांगीत पकडावं तसा अडकला होता. कशीबशी सुटका केली पण भावनिक दृष्ट्या तो तेथेच अडकला.


श्रीपादने कविताचा नंबर ब्लॉक केला. स्क्रीनवर त्याला अर्धवट जळालेला खेकडा गडगडाटी हास्य करताना भास झाला.


शिरप्या पासून श्रीपाद ते श्री हा प्रवास किती खडतर होता! किती चढ-उतार, किती मान-अपमान. त्या अनुभवाची शिदोरी साता जन्मात सरली नसती.


सातवीला केवळ शुद्ध बोलतो, नीटनेटका रहातो म्हणून अभय ला एक मार्क वाढवून; पहिला क्रमांक, शाळेच्या पाटीवर कायमस्वरूपी नाव. चढाओढीची स्पर्धा खरं तिथून सुरू झाली.अकरावी प्रवेशाला वरपर्यंत ओळख म्हणून मदनेला चांगली तुकडी आणि अठ्ठयाऐंशी टक्के मार्क असूनही श्रीपादला बरी तुकडी.


स्पर्धाच स्पर्धा. लंबी रेस. फुरसत कुणाला, एकाला पाडल्याशिवाय त्याची जागा तुमची कशी? लग्नासाठी पोरीच्या आईबापांची मुलांसाठी रेस. प्रमोशनमध्ये सहकाऱ्यांची रेस.चांगलं दिसण्याची रेस. चांगलं भासवण्याची रेस.चांगुलपणाची रेस. मदतीची रेस. माणुसकीच्या रेसला स्पर्धकच नाही. सगळी रेस. एकमेकांच्या वरचढ दाखविण्याची; पाय खेचून. तरीही “आवडता प्राणी- खेकडा”निबंधाला पारितोषिक मिळू नये केवढा मोठा उपहास.

आजपर्यंत सभ्य, सरळमार्गी श्रीपादच्या पदरात निराशा पडली. रेसमध्ये भाग घ्या किंवा किनाऱ्यावर बसून भावनाशून्य बना. मध्ये गटांगळ्या खाण्यात अर्थ नाही. तंद्रीतून बाहेर येत श्रीपाद उठला.

पश्चिमेकडे तांबूस छटा उमटत होती. पक्ष्यांची आकाशात घरी जाण्यासाठी रेस लागली होती. हातपाय धुवून तो घरात आला. विठ्ठल चांगला स्थिरस्थावर झाला होता.

आई कपात चहा ओतत म्हणाली,
“ शिरप्या, बाबा आता तुजीच काळजी लागून राह्यली. तुज दोनाचे चार हात झालं चांगला पगार मिळाला की झालं. इठ्ठल बग. सौताच्या हिमतीवर लै मोट्टा माणूस झाला. तू बी बग तसं काय.”


“हमम्..”सुस्कारा सोडत श्रीपाद ने चहाचा कप तोंडाला लावला.

आईचं बोलणं त्याच्या वर्मी लागलं. विठ्ठल कसा मोठा झाला होता, हे त्याला चांगलं ठाऊक होतं. प्रामणिकपणे कष्ट करूनही श्रीपादच्या हाती अपेक्षित यश नव्हतं. शेवटी दुनिया खऱ्याची कुठे राहिली होती. बराच विचार करून त्याने मनाशी निश्चय केला.
रात्री झोपण्यापूर्वी लॅपटॉप वरून त्याने मेल फॉरवर्ड करून टाकला. अंधार अजूनच शापित भासू लागला.
तीन दिवसांनंतर श्रीपाद ऑफिसला जॉईन झाला

प्रमोशनच लेटर त्याला मिळालं. मॅनेजर केबिनमध्ये पाऊल टाकताच श्रीपादची छाती फुलून आली. एका मेलने काम केले होते. बॉसचे बेकायदेशीर आणि अफरातफरीचे पुरावे त्याने कंपनीकडे मेलद्वारे सुपूर्त केले. श्रीपाद चा मार्ग मोकळा झाला.

खुर्चीवर बसत श्रीपाद कडवट हसला. शेवटी खेकड्यांच्या गर्दीतला तो एक खेकडा झाला होता. खेकड्याने श्रीपादमधली संवेदनशीलता मारून टाकली. त्याचा बदला पूर्ण झाला. आगीतला खेकडा मोठा मोठा होत होता..क्षणात धूर पसरत गेला. पांढरी मळकट धुराची चादर तयार झाली.जळालेल्या खेकड्याच्या राखेचे ढीग तयार झाले.खेकडा नाहीसा झाला. राखेतून लाखो खेकड्यांची पिल्लं बाहेर पडत होती. केबिन खेकड्यांनी भरुन गेली. द्वेषात आणि असूयेत जळणारा श्रीपाद अक्राळविक्राळ असूयेत जळणारा खेकडा भासू लागला.

समाप्त.

®All rights reserved. © Content of this blog are subject to copyright.

खेकडा

भाग-१

गावाच्या बाहेर ओढा वाहायचा.गावाला अर्धप्रदक्षिणा घालून काटकोनात वळून सरळ वहात जायचा.बारमाही, स्वच्छ, नितळ पाणी. त्याचा खळखळणारा आवाज शांतता भंग करायचा.दोन्ही बाजूला उंचच उंच घनदाट निंबाची,आंब्याची,जांभळाची झाडी होती. मधून एखाद्या ठिकाणी झाड तोडून जाण्यासाठी पायवाट तयार केलेली होती. तात्यांच्या शेताच्या बाजूला हा ओढा जरा उथळ व्हायचा. गावातली पोरं या बाजूला मनसोक्त हिंडायची, पोहायची.रानमेवा तोडायची. पावसाळ्यात मात्र इकडं कुणी फिरकायच नाही. ओढा तांडव करायचा, दुथडी भरून कधी कधी काठाबाहेर शेतात घुसून विद्ध्वंसी आनंद घ्यायचा.


“शिरप्या, त्या बाहेर तिथं दगडावर बसं. पाण्यात उतरू नगसं. आणि तात्याला सांगितलं मी तुला हिथं आणलं तर मुंडी पिरगाळल तुझी.” दम टाकत विठ्ठल बोलला.


श्रीपाद चड्डी सावरतं शेंबुड पुसत दगडावर बसला. ओढ्याचं थंड पाणी पायाला गुदगुल्या करत होतं. मध्येच एखादा चिंगळी मासा पायांला चावून जात होता.तो इकडे कधीच आला नव्हता. पोरं नेहमीच नजर चुकवून इकडे यायची. आज मागे लागून तो आलाच होता. हे सगळं नवीन आणि फारच अल्हाददायक होतं. पोरांची तयारी झाली.


“ विठ्या, आज तू काय गडबड करू नगं. मी म्हणलं की लगीच ठोका हाणं.” आनंद कपाळ्यावर आठ्या पाडत म्हणाला.
“व्हयं. परं मला दिसलं असं दावं.उगा कालवा करू नगं.” विठ्ठल लक्ष केंद्रित करत म्हणाला.
आनंद, जग्या, बंड्या यांनी कामाला सुरूवात केली.श्रीपादला पलीकडून काही दिसेना. त्याची चूळबूळ वाढली. तो दगडावर उभं राहून बघायचा प्रयत्न करू लागला.एका दगडाखाली वळवळ जाणवली. जग्याने बोटाने खूण केली. पोरं सावध झाली.आनंद ,बंड्या, जगूने हळूच दगड बाजूला केला. आनंदने जोरात दुसऱ्या दगडाने फटका मारला. इकडे श्रीपाद घाबरुन थरथर कापत होता. दोन मिनीटांनी पोरांनी दगड बाजूला केला. मोठा खेकडा सापडला होता. त्याच्या नांगीचा चुराडा झाला होता. बंडूने काठीने ढोसून खेकडा मेल्याची खात्री केली. पोरं आनंदून गेली. एकामागून एक असे पाच खेकडे त्यांनी पकडले. दोन तीन वेळा नेम चुकलाच, पण पाच खेकडे हातात आले.


“बास लगा, दम लागला आता. हात आखडायला लागलं. चला निगू पाण्याबाहीर.” मोठयाने श्र्वास घेत बंडू बोलला.

पोरं पाण्याबाहेर निघाली. सपाट जागेवर काड्या जमा करुन विठ्ठलने आग लावली. जग्याने एकेक खेकडा आगीत टाकायला सुरुवात केली. एक अर्धवट मेलेला खेकडा बाहेर यायचा प्रयत्न करत ह़ोता विठ्ठल काडीने ढोसून त्याला आत टाकायचा. खेकड्याची धडपड पाहून श्रीपाद आतून हादरून गेला. धुराचा वास हवेत मिसळला. वाऱ्याबरोबर राखेचे कण श्रीपादच्या अंगावर पडत होते.


पोरांनी खेकडे बाहेर काढून खायला सुरुवात केली.


“धर शिरप्या…” एक खेकडा पुढ्यात देत विठ्ठल म्हणाला.


“नगं मला..”हुंदके देत श्रीपाद तिथून निघून गेला.


पोरांच्या हाका त्याच्या कानावर पडत नव्हत्या. खालचं गवतं अनवाणी पायांनी तुडवत तो निघाला होता. त्याच्या डोळ्यासमोर तडफडणारा खेकडा केविलवाणा नाचत होता.


संध्याकाळी धारा काढून झाल्यावर शिरप्या अंगणात सुन्न बसला. काडीने मातीत चित्रविचित्र आकार काढत होता. विठ्ठल घरात जाता जाता टपली मारुन गेला. नेहमीसारखा शिरप्या चिडला नाही. विठ्ठलच्या भुवया उंचावल्या.


माणसं माणसाला गृहीत धरतात. साच्यात बसवतात. हा असा, तो तसा.हा चिडका, हा प्रेमळ. साच्यातला बंदिस्त माणूस वेगळा लागला की मात्र काही घडलंय,हे ठरवलं जातं. अबोल माणसाचं काय? त्याची व्यथा कोण कशी समजावून घेत असेल बरं??


“शिरप्या, पाणी आण बरं. आन् आत सांग दोन चा टाका.” अंगणातल्या बाजेवर बसत तात्या म्हणाले.


शिरप्याने दोन तांबे पाणी आणून दिलं.

घटाघटा पाणी पिऊन तात्या चौरे भाऊंना म्हणाले,
“ भाऊ, तरीबी म्या तुम्हास्नी म्हणलो हुतो, हा यवहार कुणासंगट बोलू नका. लोक चांगली न्हाईत. परगती देखवत नाय वो. त्या शेलारमामाचं कान भरलं असत्यालं. ईसार मागारी दिला वो. खेकड्याची जात लोकांची..वर चालली की खेचून खाली वढायचं.”
भाऊ हताशपणे मान डोलवत होते.

खेकडा ऐकताच शिरप्याच्या अंगावर सरसरून काटा आला. आगीत जीव वाचवण्यासाठी तडफडणारा खेकडा त्याच्या डोळ्यासमोर आला.


दुसऱ्याचा मृत्यू अचानक समोर पहाणं यासारखं भीतीदायक काही नाही. क्षणांआधी समोर असलेलं काही अचानक नाहीस अथवा निर्जीव झालं तर चाचपडल्यासारखं होतं नाही. क्षणभंगुर सगळचं. स्व आहे तोवर आनंद आहे, दु:ख आहे. भावनांचा मिलाप आहे. नंतरचं सगळचं असिस्त्वहीन, शून्याची पोकळी.


शिरप्याला रात्री उशीरा झोप आली. आग हळूहळू मोठी होत होत गेली. आभाळाला भिडली. आगीच्या ज्वाला आकाशातून जमिनीवर झेपत होत्या. सगळे सैरावरा पळत होते. त्या ज्वालेतून भलामोठा एक पाय बाहेर आला. शिरप्या जीव मुठीत घरून पळत होता. तेवढ्यात अजून एक पाय दुसऱ्या बाजूने त्याला घेरत होता. शिरप्या उताणा पडून आकाशाकडे बघत होता. धुराने आणि ज्वालांनी वेढलेल्या त्या रौद्रातून एक काळे मोठे डोके बाहेर आले. त्याच्या डोळ्यांत अंगार होता. शिरप्याचे अंग गोठून गेले. ह्रदयाची धडधड वाढली. लांबलांब श्वास घेत तो देवाचा धावा करत होता. थोडे पुढे आल्यावर शिरप्याला त्याचे तोंड दिसले.अक्राळविक्राळ तो म्हणाला,
“ मी तुझ्या समोर मरताना तू मला वाचवले का नाही?? मी जसा तडफडत मृत्यू गाठला तसा तूही गाठशील..आता ..लगेच..नीच माणसा, तुला जरा देखील द्या आली नाही.?”
गडगडाटी हसत त्याने आपल्या दोन्ही नांग्यात शिरप्याला पकडलं. शिरप्या जीवाच्या आकांताने ओरडू लागला

.
“नाय..नगं मला वाचवा…” घामाने डबडबलेल्या अवस्थेत शिरप्या ताडकन उठला. त्याचा घसा सुकला होता. आवंढा गिळत त्याने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. पाच वाजून गेले होते.शिरप्या घाम पुसत पुन्हा कुशीवर वळला.
“पहाटं पडल्यालं सपान खरं हुत?खेकडा माझा जीव कसा घिल बरं?”
कोंबड्याने बाग दिली. शिरप्या बळेबळे डोळे बंद करून पडला.

क्रमशः

©All content of this blog are subject to copyright.

®All rights reserved.

अक्षी

‘ माझ्या जडणघडणीमध्ये, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या ‘ती’ ला मनापासून सलाम’. मित्राचा (सो कॉल्ड) सकाळी सकाळी मेसेज आला. हा फक्त वर्षातून दोन वेळा मेसेज करतो. एकदा वाढदिवस, दुसऱ्यांदा महिला दिन. वाळवंटातल्या रखरखीत उन्हाप्रमाणे कोरड्या शुभेच्छांचं ओझं त्याने मानगुटीवरून उतरवलं. माझे पण धन्यवादाचे दोन शब्द; उगाचचं शिंपाडल्यासारखे. इतर दिवशी मी त्याच्या लेखी शून्य, माझ्या लेखी तो भ्रमाचा भोपळा हेच खरं आहे. आणि महिला दिनादिवशी त्याचं महिलांबद्दल प्रेम जागृत होत हे विशेष.

कॉलनीतील एका बंगल्यातून मोठा आवाज येतो ” नीच, कुत्र्या, हलकटा, माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलीस,” पदर खोचून दुर्गावतारी काकू उभी दिसते. कॉलनीतल्या पांढरपेशा लोकांच्या आ वासून पांढरफटक पडलेल्या नजरा रोखतात. बाईच्या जीभेला काही हाड नाही, भान सुटलयं तिचं, शोभत का? उगाचंच कुजबूज सुरु होते. त्याआधी नवऱ्याने रोज रात्री दारू पिऊन यथेच्छ तुडवलेली काकू म्हणजे सात्विक, सहनशील असते; त्यांच्या वैयक्तिक वादात आपल्याला काय म्हणून डोळ्यांवर झापड चढवलेले शेजारी मूग गिळून गप्प राहतात. आणि एकदाच बंड पुकारल्यावर दुर्गावतारी काकू मात्र क्षणार्धात संस्कारहीन होते.

“बायकांना कशाला हवयं स्पेशल लोकल डबे, बसण्याची व्यवस्था? म्हणजे आम्ही पण प्रवास करतोच की ? काम करतोच की ?” ओळखीतल्या एका काकांचा मला प्रश्न. माणसांवर माणसं चढलेल्या लोकलमध्ये पोटुशा, पाळीचा रक्तस्त्राव आणि दुखणं ओटीपोटाशी सांभाळणाऱ्या, जर्जर, कुढत, घाबरत, मसाल्यांचे-वाटणांचे असंख्य वास घेऊन घामाजलेल्या चेहऱ्याने सांभाळत प्रवास करणाऱ्या ‘ती’ ला नोकरीचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं नाही हेही तितकंच खरयं. कौटुंबिक आर्थिक गरज म्हणून ती धडपडतेय. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी नव्हेच. आणि आपण पहातोय तिच्या सहनशीलतेचा अंत ती थकेपर्यंत ! गर्दीत, रस्त्यांवर, एकट्या घरात इतकचं काय फोटोतही असंख्य नजरा वेध घेत फिरत राहतात तिच्या शरीराचा ;साडीच्या पदरातून, पायघोळ झग्याच्या चुन्यांतून . नजरा जेरबंदी करायला किंवा विकृत नजरेचे धिंडवडे काढायला आपण कचरतो पण तिच्या सुरक्षिततेच्या स्वतंत्र व्यवस्थेवर बोट ठेवून मोकळे होतो.

” अनूवहिनी फार जिद्दी आणि चिकाटीची . हुशार आहे फार,” शेजारचा पक्या दादा समोरच्या अनुराधा वहिनीवर स्तुतीसुमने उधळत असतो. इकडे पक्यादादाच्या बायकोचा जळफळाट सुरु झाला म्हणून समजा. ‘सटवी मेली,”बायकोचं बोट मोडून शिव्याशाप देणं, असूया जागृत होणं स्वाभाविक आहे. शेवटी सरस कोण दाखवायची‌ चढाओढ आहेच.! एकतर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायला थोडीच संधी आहे मग बायकाबायकांमध्ये मस्तर हेवेदावे उघडपणे प्रदर्शित होतात. एका बाईचं दुसऱ्या बाईशी फार पटत नाही म्हणून पुन्हा सिद्ध होतं.

आपण फार पुढारलेल्या, शिक्षित, उच्चतम म्हणून कामवाल्या बाईशी असभ्य वर्तन करणाऱ्या बायकांची देखील मला कीव येते. भाजी घेताना दोन रूपयांसाठी घासाघीस करत तिच्या पदराखाली पिणाऱ्या लेकराकडे, तिच्या जीर्ण आणि रापलेल्या चेहऱ्याकडे पहात शिसारी आणणाऱ्या स्त्रीयांना देखील कधीतरी “स्त्री’ असल्याची जाणीव करून द्यावी वाटते.

“माझी सून, उल्का शिकली फार पण सांगते ना. अजिबात म्हणून वळण नाही. प्रत्येक ठिकाणी बोललेच पाहिजे, मत मांडले पाहिजे. सारखं काय ऑफिसच्या कामासाठी या शहरातून त्या शहरात. बाई माणसाने इतकं मोकळेपणाने वावरु नये.” लेले बाईंची कुरबुर. ” पण उल्काला स्वयंपाक पण करायला आवडतो ना.” मी बालीशपणे विचारलं. ” हो तर. रोज ती करते. मला वयोमानानुसार जमत नाही. ” वाक्य पूर्ण करता करता बाईंना माझा टोमणा कळाला आणि त्या कसनुशा हसल्या.

स्मिताभोवती कायम मुलांचा गराडा दिसतो. ती त्यांच्यात हसताना खिदळताना दिसते. कॉलनीच्या कोपऱ्यावर एखाद्या मुलाशी बोलताना दिसली की शंकांचे कॅमेरे पटापट जागे होतात. स्मिताच्या सामाजिक कार्याची पेपरातून बातमी आल्यावर उसनं हसून ” ते काम चांगलं आहे पण हे असं भर रस्त्यावर मुलांना टाळ्या देत गप्पा मारणं शोभत नाही .” ही मॉडर्न काकूंची तिरसट प्रतिक्रिया येते.

तिच्या सौंदर्याचे मापदंड ठरवताना तिच्या सगळ्या शरीररचनेचा बारकाईने विचार केला जातो. बंद खोलीतली दोन पायांमधली वेदना, इच्छा असो वा नसो तिला मनातचं बंद करावी लागते. कारण ती मर्यादाशील पतिव्रता म्हणून मिरवते.लग्न झालं की तिचा कसाही उपभोग आणि संभोग घेता येतो हा अलिखित नियम बनवला आहे. याउलट ही तिने आवाज उठवला तर जाळणे, ॲसिड हल्ला करणे अथवा विकृतरित्या छळ करुन संपवून टाकणे, हे सडक्या पुरुषत्वाचे अहंभावीपणा सिद्ध करायचे मार्ग आहेतच. कारण तिचे स्वतंत्र विचार आजही मान्य नाहीत. तिचं अस्तित्व अधोरेखित होताना थरकाप उडतो हेच खरं.!

तिच्या टचटचीत स्तनांपासून, पुष्ट मांड्या, नाजूक वक्र कंबर, रेखीव शरीरापासून चालण्याचा डौलदारपणा रसरशीत वर्णन करुन मांडणारे खरे रसिक आणि कलाकार, हाच आपला शिक्का झालायं. तिचा पदर जरा कुठे ढळला, बोल्ड फोटोशूट केलं तर अब्रू सोडलेली बाई म्हणून यथेच्छ मुक्ताफळं उधळणारी पण आपलीच जमात आहे. पुरूषाने बाईच्या लैंगिक विषयावर लिहावं, त्याच्या आकर्षणाविषयी उघडपणे बोलावं आणि तेच स्त्रीने तिच्या स्वतःच्या लैंगिक भावना उघडपणे मांडल्या तर उथळ बाई म्हणून हिणावणारे आपणच नाही का??

सौंदर्याचा, संवेदनशीलतेचा आणि देहबोलीचा शाप स्त्रीला मिळालायं असं मला नेहमी वाटतं आलयं. तिला तिच्या सौंदर्याच्या कल्पनेत भुलवून तिच्याभोवती वर्षानुवर्षे त्या शालीनतेविषयी जाळं तयार होत गेलयं. कोळ्याच्या जाळ्यासारखं गुंतागुंतीच नाजूक जाळं..! जरा त्यातून बाहेर यायचा प्रयत्न की जाळ्याचे धागे तुटण्याच भयं आ वासून उभचं आहे. मी लहानपणापासून पहात आलेय, पणज्या आज्ज्यांचं जगणं. तेच ते. रांधा उष्टी काढा. जरा उसंत नाही. स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेणं नाही. या बाबतीत त्या इतक्या समरस झालेल्या दिसतात की यांची विचार करण्याची आणि मत मांडायची क्षमताच लुप्त झाली की काय असं वाटतं. आई, मावशी काकू नोकरी करायला लागल्या तरी त्यांच्या मागचं हे रहाटगाडगे काही सुटलेलं नाही. मत मांडायला धडपडावं लागतं. स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि पुनश्च येतो तोच फोलपणा बाईला थोडी मर्यादा हवी असा. !

मुली शिकल्या की त्या फार विचाराने स्वतंत्र होतात, स्वैराचारी होतात आणि मुख्यतः तांडव करतात, माझ्या दूरच्या, विचारांनी पुढारलेल्या(?) काकांचं मतं.त्यांना शिकवावं, पण धाकात ठेवावं. मुद्दा उखडण्याचा माझ्या प्रयत्नाला ते नेहमीच काही तरी दोन चार फेल उदाहरण देऊन छेद देतात मी पी. टी. उषा, मेरी कोम, शांता शेळके यांची उदाहरण देऊ करते. त्यावेळी ते “त्यांचं वेगळं आहे. त्यांचं नशीब थोरं. बॅकग्राऊंड चांगलं. आपली संस्कृती वेगळी.” असं पुळचाट उत्तर देऊन पान पुसायचं काम करतात.

द्रौपदीमुळे महाभारत घडलं, सीतेमुळे रामायण घडलं, जिथे स्त्री आहे तिथे कलह आहे हे ऊर बडवून सांगणाऱ्यांची कीव येते. द्रौपदीचा आदर ठेवला असता, तिची अवहेलना टाळली असती तर ती कधीच सुडाग्नीने पेटून उठली नसती. स्री मर्यादा सांभाळते, सहनशील असते. ती सहजासहजी द्वंद्व पुकारत नाही. तिच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला, तिचा अनादर झाला तर ती धगधगता लाव्हा होते. ती क्रोधाग्नीने जळत रहाते. प्रलायचं काहूर माजतं. जोवर भस्म होत नाही तोवर ती शांत होत नाही. कदाचित याच स्त्रीच्या अगणित शौर्याची, त्यागाची आणि शक्तीची भीती विखारी पौरूष्याला वाटतं असावी , म्हणूनच कदाचित त्याने तिला बंधनात ठेवललं असावं.

रोजच्या जीवनात सुद्धा साध्या साध्या गोष्टी मध्ये मला मी स्त्री असल्याची दुय्यम जाणीव करून दिली जाते त्या त्या वेळी मला शिवबा घडवणारी जिजाऊ आठवते. ज्योतिबांची सावित्रीमाई आठवते.दूरदेशी शिक्षण घेणारी गोपाळरावांची आनंदी आठवते.बहिणाबाईच्या ओव्या आठवतात.गगनभरारी घेणारी कल्पना आठवते. साहिरवर असिमीत प्रेम करणारी अमृता आठवते. मंत्रमुग्ध करणारी मधुबाला आठवते.

मला आधार देणारी माणसं शिकवतात. मला विचारांनी घडवणारे आई बाबा धैर्य देतात. प्रत्येक स्त्री प्रति आदराची भावना असणारा पुरुष मला प्रिय वाटतो. तिचा वेगळेपणा समजावून घेणारा, त्याची गंभीरता विचारात घेणारा प्रत्येक पुरुष मला क्रांतीकारी वाटतो. एकमेकींचा आदर करणारी स्त्री मला स्नेही वाटते. तिच्या धगधगत्या ज्वालेला दीप बनवणारा प्रत्येकजण मला तेजस्वी वाटतो. फार मोठा बदल कधीच अपेक्षित नसतो. अपेक्षा असते ती फक्त मोकळेपणाचा श्र्वास घेऊ देण्याची ! तिच्या मासिक पाळीच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. त्याबद्दल संकोच न करता तिला बोलता यायला हवं. तिच्या मातृत्वाचा सन्मान व्हायला हवा. वंशाच्या दिव्यासाठी होणारा छळ थांबायला हवा. तिच्या कलंकित वांझोटेपणाचं दुःख हलकं करायला हवं. एकटेपणाने आधाराविना जगणाऱ्या पांढऱ्या कपाळावर असहायतेचं गोंदण लावण्यापेक्षा तिला उभं रहाण्याचं बळ द्यायला हवं. स्त्री-पुरूषाच्या निखळ मैत्रीचं समाजाने मानलेलं अनैतिक कोंदण उन्मळून पडायला हवं. संभोगाची विकृती संपायला हवी. तिच्या लैंगिकतेच्या भावनांना नाजूकपणे हाताळायला हवं. तिच्या नाजूक शरीराची, सौंदर्याची लक्ष्मणरेषा पुसून बंधनाच्या तलवारी म्यान करायला हव्यात. फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. आता कुठे ती शिकतेय, मुक्त विहार करू पहातेय तिला सुरक्षित आभाळ द्यायला हवं. तिच्या पंखांना बळ द्यायला हवं. तिच्या गगनभरारीचा आनंद नक्कीच सुखावणारा असेल. काळजी असावी, प्रेम असावं पण स्त्री असण्याचं ओझं तिच्यावर नसावं. तिचा सन्मान हवा, आदर हवा. ती चुकली तर सुधारणारे बोल हवेत. तिच्या मागे खंबीरपणे पुरुष हवाच. अर्ध नारी नटेश्वर हा शिल्पारुपी मर्यादित न राहता समाजाचा आरसा बनला तर कोणत्या दिवसाची गरज भासणार नाही, असं वाटल्याशिवाय मात्र रहातं नाही.

– डॉ. निशिगंधा बबनराव दिवेकर

© All rights reserved.

Image source- Google.

आम्ही लग्नाळू

वय वर्ष २५-३२. प्रत्येकाचा संवेदनशील, धडपडीचा आणि खडतर काळ. करिअर, बिझनेस, कर्जपाणी, स्थैर्य या सगळ्यांचा गुंता. यातून प्रत्येक जण वाट काढत असतो. यात ज्वलंत प्रश्न म्हणजे ‘लग्न.’ त्यातही अरेंज मॅरेज असेल तर अजून डोकेदुखी. या फेजमधून जाताना भयानक मानसिक ताण तणावाला सामोरं जावं लागतं. काळं बदलतोय तशी लग्नपद्धती बदललेली नाही. अनेक स्वानुभव, इतरांचे अनुभव यातून काही निष्कर्षाप्रती आलेय. त्यावर हा ब्लॉग.

” कुठे आहेस ? अर्जंट भेटायचयं. उद्या पहाटे निघणार आहे.” संध्याकाळी मित्राचा फोन.

“क्लिनीकलाच आहे. पेशंट चालू आहेत. आठला भेटू. इकडेच ये.” एकंदरीत अर्जंट या विषयाचा अंदाज मला आला होता.

“बरं. हे दोघेही आहेत. त्यांना घेऊन येतो. भेटू बाय.”

आम्ही चौघे वयाच्या सहा वर्षांपासून मित्र.एकंदरीत एकमेकांना चांगलेच ओळखणारे.

आठच्या सुमारास तिघेही आले. तणावपूर्ण शांतता. चौघेही लग्नाच्या वयाचे. समदुःखी. हल्ली आम्ही भेटलो तरी या दडपण आणणाऱ्या विषयावरचं बोलतो.

मीच शांतता भंग करत विचारलं.

” बोल. काय झालं ? लग्न?”

“बघ ना यार..काय फालतुगिरी आहे. पुढच्या महिन्यात दोन एक्झाम आहेत. आणि घरच्यांनी लग्नसाठी स्थळ बघायला सुरुवात केली.”

“मग ?? तुझं काय म्हणणं ? त्यांचं काय म्हणणं?”

” त्यांचं म्हणणं आहे बघून तरी घे.प्रोसेस सुरूवात करू. प्रोसेस सुरुवात केली तर आता म्हणे मुलीला भेटून घे. ती मुंबई, मी सांगली. कसं शक्य आहे? त्यात वीकेंड पुण्यात. किती धावपळ. किती ओढाताण.परिक्षेचं टेंशन.”

“बरं ठीकेय. एक टेंशन संपव.भेटून बघ. कुठेतरी एकवाक्यता हवी.”

“मान्य. सगळं मान्य. पण भेटून काय सांगू? परीक्षेच्या निकालानंतर माझं भविष्यच बदलेल. आता नोकरी इथे आहे उद्या कुठे माहित नाही. यात पाच सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यात एकमेकांत गुंतलो बोलण्यातून आणि तिच्या किंवा माझ्या इच्छेविरुद्ध काय झालं तर ??”

मी निरुत्तर.

” त्याही पेक्षा. कमावती नोकरी सोडून ती येणार का सगळीकडे माझ्यासोबत?? तिने कधीच न पाहिलेल्या खेड्यांमध्ये तिला जमेल का रहायला??”

“या गोष्टी तू स्पष्ट बोल असं मला वाटतं.”

“यार..इतक्या ढीगभर मैत्रिणींशी बोलताना काही वाटलं नाही. इथे प्रचंड दडपण आहे म्हणून तुला भेटतोय. साधारण काय बोलावं काय प्रश्न विचारावे तुला वाटतं ?”

“तुझ्या अपेक्षा सांगाव्यातं.”

“दिसणं, रहाणं याबाबत कोणतीच अट नाही. पण माझं‌ सार्काझम, माझे जोक तिला सविस्तर उलगडून सांगायला लागले तर माझ्यासारखा दुर्देवी मीच.”

आमचा एकच हशा पिकला. कायम हसतमुख आणि भन्नाट विचार करणाऱ्या मित्राची तगमग जाणवत होती.

दुरचा नातेवाईक. अतिशय हुशार. चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारी नोकरी. परिस्थिती सामान्य. आर्थिक स्थिती बदलावी म्हणून प्रेम वैगेरे फंदात न पडता आधी उच्चशिक्षण पूर्ण. दिसायला सावळा. चार वर्षे लग्नासाठी स्थळे पहात होता. आधी दिसण्यावरून रिजेक्शन नंतर घरात शिकलेले नाहीत म्हणून रिजेक्शन. बऱ्याच मॅट्रिमोनी साईटवर शोधमोहीम सुरू. बोलणं व्हायचं तेव्हा त्याची मानसिकता किती खच्ची झालेली ते समजायचं. इतक्या चांगल्या स्वभावाच्या मुलाला रिजेक्ट होताना पाहून वाईट वाटायचं. तू अरेंज मॅरेज मध्ये पडू नको,मला सांगायचा. अपेक्षांची लिस्ट कमी करत करत शेवटी मुलगी मिळावी यावर तो थांबला.घरच्यांच जबरदस्त प्रेशर. लग्न झालं. विचारांचा समतोल नाही, म्हणून लग्न करुनही तो सुखी नाही. दोष कुणाला देणार?

कॉलेजची मैत्रिण. दिसायला सुंदर. थोडीशी वेंधळी. शिकता शिकता स्थळ आलं. चांगलं स्थळ हातच जाऊ नये, म्हणून घरच्यांनी मनवायला सुरुवात केली. सहा सात महिने तगादा लावल्यावर तिने नाईलाजास्तव होकार दिला. अट फक्त मुलाला लग्नाआधी एक दोनदा भेट व्हावी. एक दोनदा भेट झाली. तिला निष्कर्षाप्रत येताच आलं नाही. लग्न झालं. उच्चशिक्षित असूनही विचारांचा अभाव. कुरबुरी. लगेच मूल व्हायला हवं म्हणून दबाव. मूल झाल्यावर सगळं ठीक होईल म्हणून माहेरच्यांचा आग्रह. सातव्या महिन्यात नवऱ्याने पोटावर लाथ देऊन मारहाण केली. परिणीती प्रीमॅचुअर डिलीव्हरी. मेंटल हॅरासमेंट केस… डिव्होर्स. अवघ्या दीड वर्षात होत्याच नव्हतं. आयुष्यावर सिंगल पेरेंटची आणखी जबाबदारी.

फारसं स्वातंत्र्य नसलेल्या घरातली एक मैत्रीण. प्रचंड आर्थिक सुबत्ता. पण तितकीच मर्यादेत रहाण्याचं वागण्याचं लावलेलं लेबलं. मोठ्या घरातील मोठ स्थळ. लग्न ठरलं. मोठ्यांच्या वाटाघाटी झाल्या. मुलामुलींची पसंती वडिलधाऱ्या लोकांनीच ठरवली. लग्नानंतर भौतिक सुखात रमण्यावाचून तिला पर्याय नाही.

उच्चशिक्षित मुलगी. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. अरेंंज मॅरेज साठी स्थळ पहाणं. तेच पारंपरिक पद्धतीने साडीत मुलांसमोर बसणं,प्रश्र्नांची उत्तरं देणं. त्यानंतर मुलांची रिजेक्शन. कारण कधी उच्चशिक्षित, कधी दिसायला देखणी नाही, कधी पत्रिका किंवा आणखी काही. पंधरा वीस नकारानंतर ती डिप्रेशनमध्ये. लग्न जमत नाही म्हणून घरच्यांची कटकट, अजून जमत नाही म्हणून उंचावलेल्या भुवया, यात तिच्या मनाची कल्पना न केलेली बरी.

जवळ राहणारी एकजण.‌हल्ली बऱ्याचदा चिडचिड करत असते.‌लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाल्याचं सांगते. मुलीला ॲडजस्ट करावचं लागतं यावर ती भडकते. मी मनाने समाधानी असेल असा नवरा शोधा तिची अट. कोणाचाही स्वभाव लग्नाआधी कळत नाही, हे वडाची साल पिंपळाला लावून उत्तर. या विषयावर बोलायला सुद्धा ती तयार होत नाही. ती आगावू आहे, असं आसपासच्या लोकांचं म्हणणं.

माझ्या बरोबरीच्या, माझ्या नात्यातल्या अनेक मुलामुलींच्या या लग्नाला धरून बरीच मतमतांतरे आहेत. दिसायला अप्सरा हवी, रुबाबदार देखणा लाखांमध्ये कमावणारा नवरा हवा..अशा अपेक्षा असणारे महाभागही भेटले.टक्कल आहे, काळी दिसते, स्वतःचं घर नाही, गाडी नाही यासारखी बरीच कारणं रिजेक्शन मधून समोर आली. त्यात घरच्यांसोबत होणारे क्लॅशेस वेगळेच.

नकार पचवणं सगळ्यात जास्त औघड असतं. त्यातही एखाद्या गोष्टीचा दबाव असताना नकाराला सामोर जाणं अतिशय कठीण.

आपल्या भारतीय समाजमानसिकतेमध्ये निरोगी किंवा हेल्थी मेंटल स्टेट याबाबत फार कमी जागरूकता दिसते. आधी पाल्याकडून असणाऱ्या प्रचंड अपेक्षा, इतर मुलामुलींसोबत तुलना, अभ्यासात गती नसेल तर त्याचं जीवन किती व्यर्थ आहे, अशाप्रकारची तुलनात्मक अवहेलना आजही तितकीच मूळ धरून आहे. वाढलेली स्पर्धा, त्यातून स्वतःचं वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी धडपड ह्या आजकालच्या तरुणांमध्ये आव्हानात्मक गोष्टी दिसून येतात. नोकरीच्या ठिकाणी असणारे प्रचंड टेन्शन, मिळणाऱ्या (गरजेपुरते/कमी) पगारात कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याची कसरत ही मानसिक तणावाची कारण अधोरेखित होतात. यातून येणारे डिप्रेशन, वाढणारे शारिरीक आजार तसचं व्यसनाधीनता ह्याच मूळ समस्यांची उपाय होणं गरजेचं वाटतं. भरीत भर फक्त नोकरी लागली म्हणून लग्नाचा तगादा लावणारे पालक आणि नातेवाईक यांची मला कीव वाटते. एक जबाबदारी पेलली की उसंत न घेता दुसरी जबाबदारी हजर. त्यासाठी मनाची तयारी किंवा सर्वदृष्ट्या मुलगा किंवा मुलगी तितकी सक्षम आहे का, हे पालक विचारात घेत नाही. सरसकट नियम लावणं ही एक फार चीड येणारी बाब समाजात दिसून येते. मुलगी ठराविक वयाची झाली, शिक्षण झालं की तिचं लग्न झालं पाहिजे असा अलिखित नियम तयार झालाय. तू मुलगी आहेस, थोडंफार तुला ॲडजस्ट करावचं लागणार, हे आजही सर्रास ऐकायला मिळतं. उच्चशिक्षित झाली म्हणजे ती ऐकणार नाही, हाताबाहेर जाईल. स्वतःची मतं मांडेल, अशा विचाराने मुलीला नकार देणारी अनेक मुलं पाहिली आहेत. लग्न अशा पद्धतीने हवं, मानपान असा हवा, लग्नात कपडे काय असावेत यावरूनही जमलेली लग्न मोडलेली पहाण्यात आलेली आहेत.

मुलाची काय किंवा मुलीची काय दोन्हींकडून अपेक्षांची यादी संपतच नाही. आधी एक दोन‌वर असणारी यादी मग हजारो बारीकसारीक गोष्टी वर येऊन थांबते. मुलीने असंच वागावं, अशा प्रकारे रहावं या गोष्टी आधीपासून लादल्या जातात. मुलांचं पॅकेज विचारून त्यावरून लग्न जमवणारे आणि त्यावरून मुलगी सुखी राहिलं हे ठामपणे सांगणारे लोक पाहिले की माझी मती गुंग होते. देखणेपणा, पैसा, संपत्ती, सामाजिक स्तर या गोष्टींवर लग्न जुळवताना त्यावेळी तितकाच वेळ मुलाला आणि मुलीला दिला तर त्यांचं आयुष्य अधिक सुखकर होईल असं कायम वाटत रहातं. नातेवाईक, शेजारी पाजारी यांचा या निगेटिव्ह मानसिकतेत भर टाकायचा प्रयत्नच दिसून येतो. तिचं लग्न झालं म्हणजे मोठी जबाबदारी टळली अशी काही मानसिकता त्यांची असते. वय किती, किती स्थळं आली, रिजेक्ट होण्याची (स्वत:हून तयार केलेली) कारणं, आता लग्न झालं पाहिजे म्हणून चार चौघात पालकांना सुनावणारे महाभाग यांनी आपणही कधीतरी या प्रक्रियेमधून जाणार आहोत याचं भान ठेवलेलं बरं ! या ठराविक वयात लग्न झालं पाहिजे ( मानसिकता असो वा नसो) हेच आपलं फार मोठं दुखणं आहे. आणि यासाठी सगळ्यांनीच साचेबंद विचारसरणी तून बाहेर यायला हवं.

प्रश्न पुन्हा मानसिकतेवरच येऊन थांबतो. आखून दिलेल्या चौकटीतच समाधान मानण्याची सवय झालेली आहे. अशा एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया झाली पाहिजे. त्यात समाज काय म्हणेल, मोठे काय म्हणतील या गोष्टींच विनाकारण ओझं बाळगल जातं. जनरेशन गॅप वाढत रहातो. मग तोच ताणतणाव त्याच मानसिकता..या सगळ्यांपेक्षा आपल्याला काय वाटतं, ही गोष्ट महत्त्वाची. सरतेशेवटी आपण सगळे मानसिक सुख शोधत असतो.

लग्न ही शारीरिक संबंधाला दिलेली कायदेशीर मान्यता या पलीकडे आजही डोकावून पाहिलं जातं नाही. दोन मनांपेक्षा दोन सामाजिक समस्तर यांचं मिलन जास्त वाटत रहातं निगेटिव्ह थिंकिंग या मानसिकतेतून समाजाने बाहेर पडणं गरजेचं वाटतं. सुदृढ आणि निरोगी मानसिकतेसाठी चर्चा व्हायला हव्यात. त्यातून पॉझिटिव्ह आऊटकम यायला हवा. मत मांडणं, मांडू देणं, मतांचं आदर करणं त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेणं हेच अभिप्रेत वाटतं. डोळ्यांवरची झापड काढून या लग्नप्रक्रियेत अधिक पारदर्शक पणा आणला पाहिजे.

अरेंज मॅरेज या प्रक्रियेच्या मी अजिबात विरोधात नाही. परंतु ज्या दोघांना लग्न करायचे आहे, त्या दोघांना या प्रक्रियेत पुरेसा वेळ दिलाच जात नाही. त्यातून लग्नानंतर उद्भवणारे वाद, कौटुंबिक अस्वास्थ्य, जबाबदाऱ्या पेलण्यात आलेलं अपयश आणि आता वाढलेल्या घटस्फोटांचं प्रमाण पहाता या अरेंज मॅरेज मध्ये बेसिक कम्युनिकेशन ही फार मोठी गरज आहे. बऱ्याच लोकांनी बोलल्यानंतर या खालील गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून द्याव्या वाटतात.

१. प्रॉपर्टी, पैसा या बाहेर जाऊन शिक्षण आणि आवड या कॉलमवर अधिक भर द्यायला हवा. (अर्थात आपल्या मुलीला/मुलाला आर्थिक बाबतीत कोणती अडचण येऊ नये हे प्रत्येक पालकाला वाटते. परंतु त्यासाठी कोणतीही तडजोड करत पाल्याची मानसिकता बिघडू देणं अयोग्य.)

२. रंग, रुप, बाह्य सौंदर्याच्या चौकटीबाहेर आजही बरेचजण जात नाही. केवळ फोटो पाहून रिजेक्ट करणारे थोर लोक आहेत. त्यापेक्षा आलेली मुलगी/ मुलगा स्वभावानुसार आपल्या कुटुंबाला योग्य आहे का हे पहायचं सर्वांच्या हिताचं.

३. मुलाची/मुलींची योग्य चौकशी करावी, सहमत. परंतु ती चौकशी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात नुकसान करणारी नको. ( मुलीच्या सोशल प्रोफिईलमध्ये सर्वांत जास्त कमेंट करणारे लोक शोधून त्यांच्याकडे चौकशी करण अतिशयोक्ती वाटतं.)

४. आपल्या मुलाला/मुलीला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवा, हे आधी नीट लक्षात घ्यावं. कल घ्यावा. उगाचंच तुला काय कळतं, तुला जास्त ओळखतो, तुझं चांगलं वाईट कळतं अशा प्रकारचे खोचक उत्तरं देऊन मनाविरुद्ध लग्न करणं आणि नंतर आयुष्यभर त्या गोष्टींचा पश्चाताप करणं चूक. प्रत्येकाची आयुष्यात एका पातळीवर प्रचंड मानसिक कुचंबणा होत असते. प्रत्येक वेळी ती व्यक्त होत नाही. वेळ द्या.

५. कुटुंबापेक्षा व्यक्तिगत पातळीवर ते दोघे पुरक असतील तर कुटुंब स्वास्थ राहिल.

बऱ्याचदा लग्नाविषयी स्वत:चीच मत स्पष्ट नसतात. आपला पार्टनर कसा असावा, अपेक्षा काय याचं उत्तर आपल्याकडं असावं. पार्टनर (सगळ्या अपेक्षा पूर्ण होतं नाही ) अपेक्षेच्या जवळपास जाणारा असावा. भरमसाट स्थळ बघून नकार देऊन घेऊन डिप्रेस होण्यापेक्षा आपल्या अपेक्षांच्या जवळ जाणारीच स्थळ बघण चांगलं आहे. नकार देताना कारण सुस्पष्ट हवी. बऱ्याचदा भूतकाळातील गोष्टींचा वर्तमानात नाहक संबंध लावून तणाव‌ निर्माण केला जातो. गैरसमज, शंका-कुशंकांच योग्य वेळी निरसण केल तर भविष्यात होणारे ताणतणाव टाळता येऊ शकतात. स्पेस द्या, स्पेस घ्या. जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत यात न पडलेलचं बरं. शेवटी प्रत्येकाला पार्टनर हवाच असतो. तो योग्य वेळी योग्य विचाराने मिळायला हवा..!!

– डॉ.निशिगंधा दिवेकर

©All rights reserved.

Image source-google.

शहर शहर में

किती आले आणि किती गेले ??

कुणी आलं हसू घेऊन तर

कुणी पसाभर दु:ख घेऊन

उरलं कोण ??

कणभर माणसं आणि मणभर अनुभव..!’

यापुढे काय लिहावं ते तिला सुचेना. ती बराच वेळ अक्षरांभोवती घुटमळत राहिली. शेवटी तिने डायरी बंद केली. दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीच्या अंधारात हे शहर किती वेगळं दिसत नाही.. फिकट पिवळा मंद मंद उजेड, आवाज गोंगाट नाही की माणसांची गर्दी नाही. फक्त मिणमिणते दिवे.. कितीतरी आशांचे, स्वप्नांचे, ध्येयाचे, कष्टाचे आणि कितीतरी तळमळणाऱ्या जीवांचे ..फक्त लुकलुकणारे दिवे!! हे शहर किती भयाण वास्तव पोटात घेऊन झोपते नाही.? किती भुकेले, किती चिंताग्रस्त चेहरे या अंधारात लुप्त होतात. चालू राहते ती फक्त धावपळ जगण्यासाठीची.!

खरं तर शहरं प्रतिनिधित्व करतात एखाद्या मानसिकतेचं..एखाद्या व्यक्तीवैशिष्ट्याचं. शहरं सुखी असतात, दुःखी असतात. मदोन्मत्त असतात ;त्याचं वेळी भुकेने व्याकूळही. शहर मुळी असतातच संमिश्र भावनांचं कोंदण..! धगधगत्या लाव्हासारखं..व्यक्तही होत नाही आणि धुसमुसत राहतात आतल्या आत.!

थंडगार वाऱ्याचा बोचरा स्पर्श तिच्या शरीरावर झाला. ती शहारली. तंद्री भंग झाली. विचारांचा भुंगा मात्र डोक्यात चालूच होता. तिने कॉफी बनवायला घेतली.आज हे विचार कुठल्या कुठे नेणार याचा थांग तिला लागेना. गरम कॉफी घेत घेत ती खिडकीबाहेर बघत राहिली.

पंधरा वर्ष झाली इथे येऊन. पण हे शहर नेहमी वेगवेगळ्या रुपात पहायला मिळालं.आपलसं वाटलच नाही कधी ! या वर्षांत किती अशक्य गोष्टी घडून गेलेल्या. किती नवीन कलाटणी मिळाली. आणि आता या टप्प्यावर आयुष्य उभं.! येण्यापूर्वी किती उत्सुकता होती नाही..आता मात्र एक उदासिनता! आता ती धडाडी नाही; ते सळसळत रक्त नाही की विचाराभावी निर्णय घेणं नाही. प्रत्येक पाऊल टाकताना ते घसरू नये यावर कटाक्ष!

एका विशिष्ट वयानंतर आयुष्य किती जबाबदारीने वागायला शिकवत नाही!!

भूतकाळाची चित्रफीत तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली.आयुष्य पंधरा वर्ष मागे गेलं..

इथं मुलींची सुरक्षितता जास्त आणि शिक्षण उत्तम म्हणून घरुन परवानगी मिळाली. ती ॲक्टिव होतीच. लवकरच तिची मैत्री जमली. मोठा ग्रुप तयार झाला. पहिल्या वर्षीही ती चांगल्या मार्कांनी पास झाली. आता कॉलेजमध्ये, शहरात रुळायला लागली होती. राहणीमानातही प्रचंड बदल झाला होता. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि खेळांच्या स्पर्धांतही ती भाग घेत होती.. इथंच नजरानजर झाली.डोळ्यांतून प्रेमाची भाषा कळली.

ट्रेकिंगला गेल्यावर केलेला पहिला स्पर्श, घट्ट मिठीत दोघांचे गुंतलेले श्र्वास..आणि लाजून गुलाबी झालेले तिचे गाल..! याचं शहराने तारूण्याला बहर आणला होता. प्रेम फुललेलं होतं.

सुमीत सोबत सगळं नात संपून कितीतरी वर्ष लोटली होती. त्याच त्याच पणाला कंटाळून, भांडणाला कंटाळून तिनेच निर्णय घेतला होता. सुमीतने मनधरणी करूनही तिने नकार कायमच ठेवला होता. नंतर कधीतरी पुन्हा तो भेटला होता बायकोसोबत. आनंदात होता. चांगला बोललासुद्धा. पण ती मात्र उदास झाली. घाईघाईत निर्णय घेतल्याचा पश्र्चाताप तिला होत होता. पण तेव्हा अहंकार आडवा आलाच होता.!

कॉलेज संपून मास्टर्स करून तिने चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. तिथेही तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. असिस्टंट मॅनेजर पोस्ट मिळाली. प्रत्येक पायरीवर ती यश मिळवत होती. टीममध्ये असणाऱ्या हर्षद ने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तर तिला आभाळच ठेंगणं झालं होतं. देखणा, गोरापान आणि श्रीमंत ! याच तर तिच्या अपेक्षा होत्या.घरून‌ कडाडून विरोध असतानासुद्धा बाबांना दुखवून तिनं लग्न केले. हट्टी तर होतीच ती. लग्न झालं संसार सुरू झाला. तिची महात्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देईना. तिची घोडदौड सुरू होती. करीअरवर ती केंद्रीत झाली होती. नव्या संसाराला वेळ द्यायला तिला जमत नव्हतं. कधीकधी ती उशीरा घरी यायची तेव्हा तो दमून झोपलेला असायचा. कधीकधी तो चिडायचा. ती घट्ट मिठी मारायची. एकमेकांच्या स्पर्शात राग निवळून जायचा.

शेवटचा कॉफीचा घोट संपला. घड्याळात एकचा ठोका पडला. तिने भूतकाळ झटकला. दाराकडे नजर टाकली. हर्षद अजून घरी आला नव्हता. तिने फोन हातात घेऊन डायल केला. मोबाईल स्वीच ऑफ होता. ती काळजीत पडली. पुन्हा येऊन खिडकीबाहेर बघत राहिली. सहा महिन्यांपूर्वी तो आणि श्रुतीच्या मैत्रीबद्दल तिला समजलं होतं.मेसेज तर चालूच असायचे. श्रुतीचं कौतुक तिला आवडायचं नाही. कोणीही वरचढ झालं की ती वेडीपीशी व्हायची.एकदा तिने किती आकांत तांडव केला होता. रडून थैमाण घातलं होतं. त्याच्याकडून नाक घासून पुन्हा असं करणार नाही हे हजारदा वदवून घेतलं होतं. तेव्हापासून दोघांचे संबंध ताणले गेले होते. तिचं मन शंकांनी घेरून जायचं.परस्री आपल्या पुरूषाजवळं आलेली कोणत्याच बाईला खपत नाही म्हणा!

महिनाभरापासून ती घरातचं होती. नव्या जॉबची मॅनेजर पदासाठी ऑफर आली होती.बक्कळ पगार आणि बढती‌.पुढच्या महिन्यात जॉईन व्हायचं होतं पण त्या आधी अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घ्यायचं होतं. बुकींग झालं होतं. परवा तर निघायचं होतं. तिचा हा निर्णय हर्षदला मान्यच नव्हता पण ती हट्टाला पेटली होती. तिने एखादी गोष्ट मनात आणली तर ती करायचीच. तिच्या या हट्टापुढे हर्षदला कायमच नमतं घ्यावं लागतं होतं. या शहराने तिला मानसन्मान दिला होता. गगनाला गवसणी घालण्याचं बळ दिलं होतं. ते शहर सोडून ती नव्या शहराकडे निघाली होती जिथं स्वप्न साकार होतात असं शहर..!

दारावरची बेल वाजली.

तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. हर्षद दरवाजात उभा होता.

“किती उशीर रे?”

“तू अजून जागीच?”

“हो रे..झोप नाही लागली. तुला फोन करत होते पण लागलाच नाही.”

“हो मीटींगमध्ये होतो.” बुट काढत तो म्हणाला

“काही खाणार?”

“नको. खाऊन आलोय. थोडं पाणी दे ना. मी फ्रेश होतो.”

ती बेडरूममध्ये पाणी घेऊन आली.

पाणी घेत त्याने विचारलं,

“तयारी झाली?? काही राहिलं नाही ना??”

“नाही रे. झालयं फक्त एकदा चेक करून घेईल.”

“छान…मग खूश आहेस ना?”

“हो..मला तुझी फार आठवण येईल..”त्याच्या गळ्यात हात टाकून ती म्हणाली.

त्याचा चेहरा पडला. डोळ्यात पाणी तराळलं.

“मलासुद्धा..!”

तिने त्याच्या बाहूपाशात स्वतःला लोटून दिलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा डोळा उघडला तेव्हा तो आधीच निघून गेला होता. आळसाने कितीतरी वेळ ती तशीच पडून राहिली. सगळ्या सोशल मीडीया चेक करून झाल्या. ती उठली आवरून तिने बॅग चेक करायला घेतली. अपाईंटमेंट लेटर तिला काही केल्या सापडेना. हॉलमधले सगळे ड्रॉवर चेक करून झाले. ती काळजीत पडली. ह्रदयाचे ठोके जलद पडत होते. तिने सांभाळून इथेच ठेवला होता. ती वारंवार आठवत होती. हर्षदने तर नसेल ना ते फेकून दिलं, तिच्या मनात विचार चमकून गेला. रागाने नाकाचा शेंडा लाल झाला. हो त्यानेच फेकून दिलं असणारं, तसंही त्याला माझी प्रगती बघवते कुठे? बायकोला कायम हाताखाली ठेवणारी ही पुरुषी जमात?? खरं वागायला जमतचं कुठे यांना? शरीराची भूक भागली की झालं! ती तणतणत स्वतःशी म्हणाली. रागाचा , शंकेचा, द्वेषाचा पारा चढला होता. तिचा स्वाभिमान दुखावला होता.

ती बेडरूममध्ये आली. एकेक ड्रॉवर नीट चेक करत होती‌. एका कप्प्यात एका फाईलकडे तिचं लक्ष गेलं. तिने ती उघडली

‘घटस्फोट अर्ज’

अर्जदार- हर्षद

ती मटकन खाली बसली.शेवटी याने केलचं असं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.त्याने वरवर नाटक तर केलं होतं श्रुतीसोबत काही नाही दाखवायला. आणि पाठीमागे असं विश्वासघात केला, तिच्या डोक्यांत शंकाकुशंका तयार झालेल्या. तारीख दोन महिन्यांपूर्वी होती. ती फाईल अधाशीपणे उलगडत होती एक एक पेपर पहात होती. एक हॉस्पिटलची पावती तिला दिसली. तिला जबरदस्त धक्का बसला. हे हर्षद ला कुठून मिळालं?? ती घामाने डबडबली..तिच्या घशाला कोरड पडली.

आपण गर्भपात करून घेतल्याचं हर्षद ला कळालं?

प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याला न सांगताच तिने गर्भपात करून घेतला होता. करीअरची आता कुठे सुरुवात झाली होती. आणि ही मॅनेजर पदासाठी ऑफर तिला गमवायचीच नव्हती. त्यासाठी तिने न जन्मलेला मांसाचा गोळा भावना गुंतायच्या आधीच स्वतःपासून तोडून टाकला होता. त्याच्या पासून हे सगळं तिनं शिताफीने लपवलं होतं..पण त्याला कळलंच शेवटी.

पलंगाला टेकून ती सुन्न बसली. त्याचं तरी काय चुकलं म्हणा.. आपल्यापेक्षा कमी पदावर आपल्या दबावाखाली तो राहिलं म्हणून स्वार्थापोटी लग्न केलं. नवरा सपोर्ट करतो म्हणून किती करीअर वर लक्ष दिलं. कधीकधी उशीरा आले तर स्वयंपाक करून जेवणासाठी वाट पाहणारा नवरा कधी दिसलाच नाही. प्रेमाने जवळ आला तर थांब रे महत्त्वाचं काम करतेय म्हणून त्याच्या भावना कधी समजून घेतल्याचं नाही. श्रुती सोबत त्याची वाढती मैत्री पाहून आपण कुठे चुकलो किंवा त्याचा एकाकीपणाला समजून न घेता आकांताने त्यालाच चुकीचं ठरवलं. पण आपल्यासुद्धा बरेच मित्र होते. सुमीत नंतरही बरीच मुलं आयुष्यात आली.तरी आपण हर्षदची मैत्री समजावून घेऊ शकलो नाही. तो मात्र कायम तसाच होता. प्रेमळ, काळजी घेणारा सपोर्ट करणारा. दोघांचं पोटात वाढणारं लेकरू आपण जन्मदात्याला माहिती न पडता झिडकारून दिलं.इतकी कशी आपण अप्पलपोटी ,स्वार्थी महत्त्वाकांक्षी झालो?? आजपर्यंत स्वतःभोवती फिरत आलोय..मर्जीने..त्यात किती नाती गमावली..आणि आता हा..अर्ज दोन महिन्यांपासून पडून आहे पण तो अजूनही सगळं ठीक होईल आशा करतोय.?? आपण त्याच्या जागी असतो तर?? सगळं लाथाडून क्षणात निघून गेलो असतो हे शहर सोडून..आता दोन पर्याय आहेत..हे शहर ही माणसं इथचं सोडून जायची‌‌.. किंवा याच शहरात पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करायची..शहर वाढलं होतं तशीच तिची महत्त्वाकांक्षा ‌.आणि महत्त्वाकांक्षी आयुष्याची ही अशी ससेहोलपट!

फोनची रिंग वाजली तिची तंद्री भंग पावली. तो फोनवर होता

” ऐक ना..बेडरूममध्ये माझ्या कप्प्यात वरच्या बाजूला तुझं लेटर ठेवलं आहे. गडबडीत कुठेतरी टाकशील म्हणून मीच ठेवलं होतं. आता आठवलं म्हणून फोन केला. बरं ऐक मीटिंगला जातोय. रात्री बाहेर जायचा प्लॅन आहे. तयार रहा.” त्याने फोन‌ ठेवून दिला. तिच्या हातातून फोन गळून पडला.

ती धडपडत उठली. डोकं सुन्न झाले होते. ती खिडकीबाहेर बघत राहिली. गाड्या धावत होत्या.डोळ्यांतलं पाणी केव्हाचं आटलं होतं. पळणारी झाडं, गडबडीत असणारी माणसं डोळ्यांसमोर दिसत होती. शहर पुन्हा वेगळ्या रुपात दिसत होतं. .. एकीकडे हर्षद आणि एकीकडे महत्त्वाकांक्षा..!. मदोधुंद व्हावं तसं असूया, मत्सर, द्वेष, महत्त्वाकांक्षा यांनी तिला घेरून टाकलं होतं..इथं भावना आपली माणसं यांच्यापासून ती दूर दूर होत चालली होती. नियतीने नवा फासा टाकला होता.निर्णय तिच्या हातात होता..शहरातच रहायचं की शहरचं सोडायचं..!

समाप्त

All content of this story are subject to copyright.

© All rights reserved.