तू

This is the post excerpt.

Advertisements

तू अशीच रहा….
अवखळ वाऱ्यासारखी,
नुकत्याच उमललेल्या कळीसारखी,
दवबिंदूंनी भरलेल्या पानासारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला
भ्रमरांनी कितीही गुंजारव केला भोवती..

तू अशीच रहा..
सूर्याच्या तेजस्वी प्रकाशासारखी,
ताऱ्यांप्रमाणे शीतल लुकलुकणारी,
ज्योतीप्रमाणे तेवून दुसऱ्यांना प्रकाशणारी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
कितीही ग्रहणे आली तरी…

तू अशीच रहा…
निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी,
जीव अमर करणाऱ्या सुधेसारखी,
सागराला मिळण्याची ओढ असणाऱ्या नदीसारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
गडगडाटी पाऊसधारा कोसळल्या तरीही…

तू अशीच रहा…
निरभ्र आकाशासारखी,
ग्रह-चंद्र-सूर्य-ताऱ्यांच्या आकाशगंगेसारखी,
क्षितिजापल्याडच्या असिमीत अंबरासारखी,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
काळ्या मेघांनी गर्दी केली तरीही…

तू अशीच रहा…
जशी आहे तशीच,
स्वतःच्या गुणदोषांसहीत,
कधीही बदलू नकोस स्वतःला,
या अभिलाषी जगासाठी…।।
       -निशिगंधा बबनराव दिवेकर

बकुळ

images (2)
” अय्या आई, हे बघ….” छोटी शाल्वी आनंदाने ओरडली.

“काय गं तुझा आरडाओरडा सारखा..लहान लहान गोष्टींसाठी हाका मारत रहायच्या.” मीरा आतून उत्तरली.

” आई, तू बाहेर तर येऊन बघ एकदा..”शाल्वी म्हणाली.

आता हिने काय नवीन खूळ काढलयं याचा विचार करत हातातलं काम टाकून मीरा अंगणात आली.

मीराचं घर अगदी टुमदार होतं. घराला लागून छोटी बाग होती. अनेक फुलझाडं ,फळझाडांची गर्दी होती. तुळशीने अंगण अजून पवित्र केलं होतं. पाच खोल्यांच्या बैठे घरात मीरा, तिचा नवरा, छोटी शाल्वी आणि सासरे रहायचे. घर तसं खेड्यात होतं. नवरा फॉरेस्ट ऑफिसर असल्याने दुर्गम भागात बऱ्याचदा बदली होत असे. विरंगुळ्यासाठी मीरा घराभोवती बागकाम करत असायची.

” बघितलं का.. ? बकुळाला कित्ती फुलं आली आहेत..किती सुंदर आहेत ही..” दोन चार फुलं उचलून घेत शाल्वी म्हणाली.

“खरचं की गं बाळा, कित्ती छान सुगंध आहे..” हर्षाने मीरा म्हणाली. फुलांकडे पाहता पाहता ती आठवणींत हरवून गेली.

“मीरा, इकडे ये बाळ…” बाबांनी हाक मारली.
मीरा धावतच बाहेर आली.
“काय झालं बाबा..?” मीराने कुतुहलाने विचारलं.
“तुझ्यासाठी बाबाने काहीतरी आणलयं.” तिला कडेवर घेत बाबा अंगणात आले. अंगणातल्या रोपट्याकडे हात दाखवत बाबा म्हणाले,”आज मीराला ही वेगळी भेट”
“बाबा,हे कोणतं झाड आहे ?” मीरा म्हणाली.
” बकुळ. सुंदर आणि सुवासिक फुलं येतात याला.” बाबा मीराला समजावत म्हणाले.
” बाबा, याला आपण पुढच्या अंगणात लावू.” मीरा पळतच खोरं आणायला गेली.दोघांनी मिळून ते रोपटं लावलं. मीरा कितीतरी वेळ नव्या रोपट्याभोवती फिरत होती.नवा मित्र मिळाला होता तिला!
दिवस सरत होते.मीरा मोठी होत होती आणि बकुळ सुद्धा.!बकुळ बहरला. या मोसमी त्याला भरपूर फुलं आली. मीरा आनंदाने नाचायला लागली. तिने बाबांना बोलावलं आणि ओंजळभर फुलं त्यांच्या हातात दिली. बाबांनी कौतुकाने तिच्याकडे पाहिलं. तिला हाताला धरून पायरीवर बसवलं आणि म्हणाले,
” मीरा…आता तू सुद्धा मोठी होशील.अंड्यातून बाहेर पडशील. नवं जग तुला खुणावेलं.नवी माणसं तुला भेटतील. काही चांगली काही वाईट.बकुळ हो ! बकुळासारखी उत्तुंग आणि बहरदार..! सगळ्यांच्या आयुष्यात सुगंध दे पण सहजासहजी हाती गवसू नकोस. स्वतःच्या पायावर उभं राहताना जमीन मात्र विसरु नकोस.प्रत्येक वेळी मी बरोबर नसेल बकुळाचा सुवास मात्र जवळ ठेव.” बोलता बोलता बाबांच्या आवाजात हुंदका भरला.मीराने बाबांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, “होय बाबा.”
बकुळाच्या पानांची सळसळ झाली. बकुळ समाधानाने हसला.

क्रमशः
© All rights reserved.

Image source- google.

वाटा

ती वाट आणि तीच संध्याकाळ

बदलत राहतात दिवसाची गणित

वाटेकडे एकटक पाहणारे तेच डोळे

ते मात्र बदलत नाहीत आणि ढळत नाहीत

बदलतात ढगांच्या राशी

आणि क्षितिजावरची रंगसंगती

फिक्कट होतो डोळ्यांतला प्रकाश

धूसर अंधूक आणि दिशाहीन

अस्पष्ट खुणांतून वाट पाहत राहतात

वाट पाहत राहतात तू येशील कधी अचानक

त्याच वळणावरून कधीतरी

जिथून तुझी आणि माझी वाट वेगळी होते

कित्येक दिवस थांबलेली मी

त्याच वाटेवर तुला पाठमोरा पाहत

तुझ्या वाटेवर आणि तुझ्यासोबत

चालायची मुभाच नसल्याने

माझी नजर तुझ्यापर्यंत पोहचत नाही

पण मन मात्र तुझ्यापाशी कधीच पोहोचते

भांबावलेले डोळे वाट पाहत राहतात

एकटेच एकटक आणि एकांगी

कधीतरी तू येशील अचानक

येशील का येणारच नाहीस

भ्रम की भ्रमनिरास हा

कधीच न भेटणाऱ्या वाटांसारखा?

©All rights reserved.

वासनेंच्या ज्वाला

पाशवी नजरेंतून बाहेर पडतात
त्या वासनेच्या भयान ज्वाला
कोंडतो तिचा श्वास आणि
संपतात तिच्या नाजूक संवेदना
नसानसांतून वाहत राहतात
फक्त अमानुषकीच्या वेदना
माणुसकीची लक्तरे टांगून
मर्द म्हणून घेणाऱ्यांनो
जातीपातीचा विचार सोडून
एकदा फक्त डोकावून पहा
त्या निष्पाप डोळ्यांपासून
स्वतःच्या खोल अंतर्मनात
येणाऱ्या काही काळात
हजार वेळा विचार करतील
त्या अजाण बालिका
मातेच्या सुरक्षित उदरातून
बाहेरच्या नराधमांच्या जगात
पाऊल टाकण्यापूर्वी…।

एक चंद्र

images (24)

एका त्या चांदण्या रात्री, तू पाहतोस आकाशीचा तो चंद्र.. मी देखील न्याहाळते तोच चंद्र.!  दूरूनच.. एकच चंद्र तरी तुझ्या आणि माझ्या वेगळ्या आकाशी..! निरभ्र त्या आकाशात मंद तारकांनी मांडलेला खेळ. इवलासा त्यांचा प्रकाश तरीदेखील तुझं आणि माझं अख्खं विश्व उजळून निघालेलं..तू शोधत असतोस अस्तित्व त्या काळ्या ढगांआड लपलेलं.. मी अधीर होऊन तुझा मागोवा त्या ढगांआड घेत राहते. तुझ्या मनाची घालमेल आणि तुझा तो एकटेपणा मला जाणवत राहतो हळूच वाहणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शातून..एरवी माणसांच्या गर्दीतला तू आणि कणखर असणारा तू काहीसा हळवा होत जातोस. दाखवतं नसलासं तरी मिट्ट काळोखात तुझ्या चेहऱ्यावरची ती अस्पष्ट वेदना मला दिसून येते अगदी चंद्रावरच्या डागांप्रमाणे..!  तू स्वतःला समजावत राहतोस. आयुष्याला एकटं सामोर जायचा निर्धार करतोस.. कदाचित तुझ्या भावनांना तू पांघरून घालून निजवतोस. पण तुझ्या भावना माझ्या काळजात उतरुन जातात अगदी हळूवारपणे चोरपावलांनी..! तुझं आणि माझं अतूट काही नातं असल्यासारखं एकचं मन असल्यासारखं माझं ह्रदय वेदनेने भरुन जातं. कित्येक दिवस पापण्यांवर रोखून ठेवलेले अश्रू मात्र बांध फोडून ओघळून जातात. रात्र एकटी म्हणून मी देखील मनसोक्त रडून घेते. पण लक्षात येत नाही तो चंद्र आकाशातून डोकवत आहे..तुझा आणि माझा एकच चंद्र.. तू ही एकटक खिडकीतून पाहत राहतो बदलणारे ढग, बदणाऱ्या तारकांची खेळाची मांडणी..तू विचार करत राहतो बदलणाऱ्या माणसांच्या व्याख्यांचा..तुझ्या या विचारांच्या गुंत्यात मात्र माझ्या नावाची गाठही नसते. आणि माझ्या आकाशात मात्र तुझीच चिंता असते. एकच रात्र, एकचं चंद्र तरीदेखील दोघांचं वेगळं विश्व मर्यादांनी आखलेलं. ततूविचार करता करता निद्राधीन होतो..मी मनात गाणं गुणगुणतं राहते..तो चंद्र एकला मात्र दोघांच्या भावना साठवून हळूहळू अस्तास जातो.

एक दिवा

images (1)

अस्तास जातो तो सूर्य,
मनी गर्द काळोख होतो.
टिपूर चांदण्यातही चंद्र
तुझाच वेध घेतो.
स्वप्नरथांवर स्वार होऊन
तू अलगद डोकावतो.
निद्रिस्त साऱ्या दिशा तरीही
एक दिवा मात्र मिणमिणतच राहतो..

एकटेपण

images (18)

हल्ली हवंहवसं वाटायला लागलयं..

एकटेपण..

चहूबाजूंनी शांतता, कुणीचं नाही बघणारं

सळसळणारा वारा, धरती आणि  निळभोर आकाश..

सगळ्यांमध्ये फक्त एकच श्वास,

स्वतः चा विचार करणारा,

विचारांच्या धाग्यात एकटाच गुंफणारा,

खरचं हवंहवंसं वाटतयं..एकटेपण..

ना कुणाचा खांदा टेकायला,

ना कुणाचा अबोल स्पर्श,

ना कुणाचा मायेचा शब्द,

फक्त एकच मन..अनेक प्रतिबिंब असणारं..

भावनांची एकेक कळी उलगडणारं,

धडपडत्या काळाच्या व्रणांवर

हळूवार फुंकर घालणारं,

निश्चयाच्या उमेदीने उभं रहायला लावणारं,

आठवणींच्या गर्तेत हळूच अश्रू ढाळणारं,

असं एकटेपणं..एकचं ह्रदय सामावलेलं..

मनाचा एकेक कप्पा उघडणारं,

गालातल्या गालात हसणारं,

कुणाच्यातरी आठवणीने लाजणारं,

स्वतःमधला स्व शोधून देणारं,

असं एकटेपणं..हवहवसं वाटतयं.

© All rights reserved.

तू माझा किनारा

images

मी एक बेभान उसळणारी लाट..

तू एक तटस्थ किनारा..

मला सीमित करणारा.

मी वेगाने वेडीपीसी होते

धडकते उसळते तुझ्या चरणाशी..

तू मात्र धीरगंभीर

जणू लक्ष्मणरेषा आखलेलला..

मी भांबावते रौद्र रूप धारण करते

तरीदेखील तू ध्यानस्थ

क्षितीजापल्याड नजर स्थिरावलेलला

माझ्या भावनांचे वेग

तुला तूसभर चिरा पाडत नाहीत..

भरती ओहोटी येते..

मला तुझ्यापासून दूर करते..

तरीसुद्धा मी तुझ्यापाशी येऊन थांबते.

सूर्याने लागलेल्या धगीनंतर..

चांदण्या रात्री शीतल ओलावा देण्यासाठी

शंखशिंपल्यांची तुझ्या पायी उधळणं करण्यासाठी..

निरंतर.।

 

© All rights reserved.

Image- wpmedia.com